Selu Walur Stepwell Revival
सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या वालूर येथील सर्पिलाकार (हेलिकल) बारवेच्या जतन आणि संवर्धनाचे काम सेवावर्धिनी संस्थेने हाती घेतले आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाची कामे करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून वालूरच्या ऐतिहासिक बारवेचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
बारवेच्या संवर्धनाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण केले जाणार असून, बांधकामासाठी विशेषतः देगलूर येथून दगड मागविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामासाठी शिल्पकारांची विशेष टीम वालूर येथे दाखल झाली आहे.
कोणताही गाजावाजा न करता बारवेच्या संवर्धन कामाचा शुभारंभ गावचे सरपंच संजय साडेगावकर, गणेशराव मुंडे, शैलेश तोष्णीवाल, मारोतराव बोडखे, वाल्मिक दराडे, गोपाळ अबूज, गणेशराव खरबे, बाजीराव बोडखे आणि राजेश साडेगावकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.
१९९८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवावर्धिनी संस्थेची स्थापना झाली. समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच समाजाच्या गरजांशी संबंधित विविध उपक्रम राबविणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या कामांसाठी शासन किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून आर्थिक मदत घेतली जात नाही. विविध कंपन्यांच्या आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून ही सामाजिक कामे केली जातात.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिसऱ्या जन्मशताब्दीनिमित्त सेवावर्धिनीकडून ‘अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील १७ बारवांचे जतन व संवर्धन करण्यात आले आहे.
वालूरच्या बारवेच्या माध्यमातून संस्थेने मराठवाड्यातही आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. पोस्ट विभागाने टपाल तिकीट काढून गौरविलेल्या वालूर येथील बारदानी बारवेच्या संवर्धनाचे कामही लवकरच सुरू होणार आहे.
हेलिकल स्टेपवेलच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिवाळीपूर्वी करण्यात येणार असून, या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डिकर उपस्थित राहणार आहेत. तसेच जलपूजन किशोरजी व्यास यांच्या हस्ते होणार आहे.
परभणी तालुक्यातील आर्वी आणि सेलू तालुक्यातील रायपूर येथील प्राचीन बारवांच्या पुनरुज्जीवनाचे प्रस्ताव सेवावर्धिनी संस्थेकडे दाखल झाले आहेत. त्यापैकी रायपूर येथील प्रस्तावाला संस्थेने मान्यता दिल्याची माहिती शासनाच्या बारव संवर्धन समितीचे सदस्य तथा समन्वयक मल्हारिकांत देशमुख यांनी दिली.