परभणी

Municipal officers absent in Purna: पूर्णा पालिकेचा कारभार रामभरोसे? CEOसह महत्त्वाचे अधिकारी नियमित गैरहजर असल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप

पालिकेच्या कार्यालयात दररोज हेलपाटे मारत असतानाही मुख्याधिकारी गैरहजर असल्याचे चित्र दिसून येत आहे

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : येथील नगरपरिषदेचा कारभार मागील अनेक दिवसांपासून रामभरोसे सुरू असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे. मुख्याधिकारी (CEO), लेखापाल तसेच इतर महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचारी नियमितपणे कार्यालयात हजर राहत नसून ड्युटीला दांडी मारत इतरत्र बसून पालिकेचे कामकाज चालवत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.

शहरवासीयांच्या म्हणण्यानुसार, कितीही तक्रारी करण्यात आल्या तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, शहर विकासाच्या नावाखाली आलेल्या निधीतून थातुरमातुर कामे करून त्यांची देयक बिले कार्यालयात न थांबता बाहेर कुठेतरी सोयीच्या गुप्त ठिकाणी बसून फाईल आणि धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच मुख्याधिकारी, लेखापाल आणि अन्य अधिकारी दररोज कार्यालयात अनुपस्थित राहून क्षेत्रभेटीच्या नावाखाली फिरत असतात आणि वाहनात बसूनच कामकाजाची कागदपत्रे हाताळली जात असल्याचाही आरोप आहे.

सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी पालिकेच्या कार्यालयात दररोज हेलपाटे मारत असतानाही मुख्याधिकारी गैरहजर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक वैतागले असून त्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, पालिकेवर प्रशासकराज असतानाही संबंधित अधिकारी नियमित कार्यालयात येत नसून कंत्राटदारांच्या निकृष्ट आणि बोगस कामांची देयके काढण्यावर भर दिल्याचा आरोप यापूर्वीही झाला होता. त्यानंतर पालिकेची पंचवार्षिक निवडणूक होऊन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची सत्ता अस्तित्वात आली, तरीही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला दिसत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

शहरात मूलभूत नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन मुख्याधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांना नियमित कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत ताकीद द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT