

CCMP certification of homeopathic doctors suspended for now
परभणी : पुढारी वृत्तसेवा राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्र अर्थात अॅलोपॅथीमध्ये मर्यादित व्यवसाय करता यावा, या उद्देशाने सुरू केलेलेल्या आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या (सीसीएमपी) प्रमाणपत्र वितरणावर तूर्तास ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबत राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १८ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पत्रात सीसीएमपी प्रमाणपत्र देण्याबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. विविध बैठका तसेच प्राप्त आदेशांचा संदर्भ देत शासनाने आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) आणि एमएआरडी यांच्या संपाचा आरोग्य सेवेवर झालेला परिणाम विचारात घेतला असल्याचे नमूद केले.
शासनाच्या पत्रानुसार, सध्याची परिस्थिती निवळल्यानंतर तसेच सीसीएमपी संदर्भातील कार्यपद्धती अंतिम होईपर्यंत किंवा संबंधित प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय प्राप्त होईपर्यंत प्रमाणपत्र देणे संयुक्तिक ठरेल. त्यामुळे या कालावधीत प्रमाणपत्र वितरणाबाबत घाई न करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना आधुनिक औषधशास्त्रातील मर्यादित उपचारपद्धतीचा व्यवसाय करता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने १३ ऑगस्ट २०१४ रोजी आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता.
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आवश्यक प्रशिक्षण व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील ठरावीक बाबींमध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध प्रश्न, वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांची भूमिका आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे हा विषय गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.
होमिओपॅथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्रातील व्यवसायाच्या मर्यादा, संबंधित व्यावसायिकांना कोणत्या उपचारपद्धतीची परवानगी असावी, तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्दे यावरून वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळी मते व्यक्त होत आली आहेत, असे त्यात म्हटले आहे.
न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
सीसीएमपी संदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रियेकडेही वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. शासनाच्या पत्रात स्पष्टपणे न्यायालयाचे अंतिम निर्णय प्राप्त होईपर्यंत असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि शासनाकडून निश्चित होणारी कार्यपद्धती यानंतरच प्रमाणपत्र वितरणाबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १८ ऑगस्टच्या पत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला आपली भूमिका कळविली. त्यामुळे सीसीएमपी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या संबंधित होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांचे पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे-