

गंगाखेड : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष्य करून जबरी चोरी व चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोनपेठ येथून शिताफीने ताब्यात घेतले. सौरभ ऊर्फ रघु महादेव मोटे (वय २४, रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ९० हजार रुपये रोख तसेच दोन टीव्हीएस मोटारसायकली, असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गंगाखेड शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग व जबरी चोरीच्या घटनांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परभणी शहर व ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान, महातपुरी फाटा येथे पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एक आरोपी सोनपेठ येथे आला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने पाथरी रोड, सोनपेठ परिसरात संशयिताचा शोध घेतला. यावेळी पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने आपले नाव सौरभ ऊर्फ रघु महादेव मोटे असल्याचे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने हुसेनी अली इराणी, अली अब्बास इराणी आणि बागर इराणी यांच्यासोबत मोटारसायकलवरून गंगाखेड व परभणी शहरात जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीच्या वाट्याला आलेली रक्कम त्याच्या वडिलांमार्फत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच आरोपीकडून दोन टीव्हीएस मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
सौरभ मोटे याच्याकडून गंगाखेड पोलीस ठाण्यातील दोन, परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यातील एक, कोतवाली पोलीस ठाण्यातील एक आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एक, असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार तसेच गणेश सवंडकर, महेश कवठाळे, राहुल परसोडे, सचिन भदर्गे, माणिक वाघ, महारुद्र सपकाळ, गजानन शिरसागर, दिलीप निलपत्रेवार, राम पौळ आणि नामदेव धोत्रे यांनी केली.