परभणी

Parbhani news: परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वी आंदोलन

मराठा आंदोलकांची खा.जाधवांकडून समजूत ; तरीही घोषणाबाजी सुरूच, अखेर पोलिसांकडून धरपकड

पुढारी वृत्तसेवा

परभणी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वी रविवारी (दि.30) परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. मराठा आरक्षण मागणीसह सभेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांशी खा.संजय जाधव यांनी स्वतः थांबून संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करताना खा.जाधव यांनी मनोज जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देत हात उंचावून आंदोलनकर्त्यांसोबत घोषणेत सहभाग घेतला. मात्र, काहीवेळ संवाद झाल्यानंतर खा.जाधव सभास्थळाकडे रवाना झाले आणि त्यानंतरही आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात रविवारी सकाळपासूनच मोठी राजकीय हालचाल सुरू होती. सभेसाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची मोठी गर्दी होत असताना शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. याच दरम्यान मराठा समाजातील काही आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एकत्र आले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसह आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजीमुळे काहीकाळ शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलनात्मक वातावरण निर्माण झाले. याचवेळी शिवसैनिकांसोबत पायी जिल्हा क्रीडा संकुलातील सभास्थळाकडे जात असलेले खा.जाधव आंदोलकांजवळ थांबले. आंदोलकांकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीची माहिती घेत त्यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. खा.जाधव यांनी उपस्थित आंदोलकांशी चर्चा करीत त्यांची बाजू समजून घेतली. यावेळी किशोर रणेर, गजानन जोगदंड यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका खा.जाधव यांच्यासमोर मांडली. आंदोलकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर खा.जाधव यांनी त्यांना परिस्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन केले. माझ्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा. एवढे लोक जमल्यावर काय करायचे? अशा शब्दांत त्यांनी आंदोलनकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सभा आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संयम राखण्याचे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केल्याचे दिसले. काहीवेळ आंदोलक आणि खा.जाधव यांच्यात चर्चा सुरू होती.

या संवादादरम्यान एक वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. आंदोलकांकडून सुरू असलेल्या मनोज जरांगे आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणेत खा.जाधव यांनीही सहभाग घेतला. हात उंचावत त्यांनी आंदोलकांसोबत घोषणा दिली. एका बाजूला आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या घोषणेत सहभागी होत त्यांच्याशी संवाद साधण्याची भूमिका खा.जाधव यांनी घेतल्याने उपस्थितांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर खा.जाधव शिवसैनिकांसमवेत जिल्हा क्रीडा संकुलातील सभास्थळाकडे रवाना झाले. त्यांच्या संवादानंतर आंदोलनाची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, खा.जाधव तेथून पुढे गेल्यानंतरही आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच राहिली.

शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलकांकडून सातत्याने घोषणा दिल्या जात असल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सतर्क होते. घोषणाबाजी थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेऊन परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस कारवाईनंतर शिवाजी महाराज पुतळा परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

सभा सुरू होण्यापूर्वीच आंदोलनाची चर्चा

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेपूर्वीच मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एकत्र येत घोषणाबाजी केल्याने या घटनेची शहरात चर्चा रंगली. विशेषतः आंदोलकांशी थेट संवाद साधण्यासाठी खा.जाधव स्वतः थांबले आणि त्यांनी आंदोलकांच्या घोषणेतही सहभाग घेतल्याने ही घटना विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर झालेल्या पोलिस कारवाईमुळे आंदोलनाच्या घटनाक्रमाला आणखी वेगळे वळण मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT