परभणी : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाणीटंचाई वाढत असताना घराघरांत मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जात आहे. मात्र, हेच साचलेले पाणी आता डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराला निमंत्रण देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एडिस इजिप्टाय या डासांच्या वाढत्या उत्पत्तीमुळे जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला असून, नागरिकांनी तातडीने सावध होण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त (१६ मे) जिल्हा आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली असून, डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रावजी सोनवणे यांनी नागरिकांना घरातील आणि परिसरातील पाणीसाठ्यांची नियमित तपासणी करण्याचे तसेच पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यूचा प्रसार करणारे एडिस डास हे प्रामुख्याने दिवसा चावतात. कुलर, जुने टायर्स, प्लास्टिकच्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, शोभेच्या कुंड्या, उघड्या पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणी साचलेले स्वच्छ पाणी हे त्यांच्या उत्पत्तीचे प्रमुख केंद्र बनत आहे.
अनेक नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे डासांची पैदास झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आठवड्यातून किमान एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ धुण्याचे, टाक्या झाकून ठेवण्याचे आणि घराभोवती स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. डास प्रतिबंधक औषधे, मच्छरदाणी आणि फवारणीचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. अचानक तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांत वेदना, अंगावर लाल पुरळ अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विलंब झाल्यास डेंग्यू गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेंटेनल सर्व्हेलन्स सेंटरमध्ये डेंग्यू तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय आरोग्य यंत्रणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ६३४ संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही संख्या नियंत्रणात असली तरी वाढत्या तापमानामुळे आगामी काळात धोका अधिक तीव्र होण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. डेंग्यूवर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय मानला जातो. त्यामुळे घर स्वच्छ — परिसर स्वच्छ हा मंत्र अंगीकारून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.