

पाथर्डी: तालुक्यातील भालगाव येथील कासुळे वस्तीवर डेंग्यूचा धोका निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. ते डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या रक्तनमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.
सुमारे सव्वा चारशे लोकसंख्या आणि 80 घरांची लोकवस्ती असलेल्या कासुळे वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून आरोग्य विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 10 जण तापानेे बाधित आढळले असून त्यापैकी सहा रुग्ण डेंग्यूचे संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रुग्ण सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, आणखी काही सौम्य प्रकाराच्या तापाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना औषधोपचार करण्यात आले आहेत. वस्ती परिसरात दूषित पाण्याचे साठे आढळून आल्याने आरोग्य विभागाने ते तत्काळ हटवून संबंधित ठिकाणी औषध फवारणी केली आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नारायण वायभासे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या आरोग्य विभागाचे 12 कर्मचारी असलेली तीन पथके कासुळे वस्तीमध्ये कार्यरत असून घरोघरी जाऊन तपासणी सुरू आहे.
खरवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल लाड व डॉ. मयुरी परजणे हे पुढील 15 दिवस वस्तीमध्ये विशेष लक्ष ठेवून नागरिकांची तपासणी करणार आहेत.
तापाच्या रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये, साठवलेल्या पाण्याच्या टाक्या व भांड्यांवर झाकण ठेवावे, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन डॉ. दराडे यांनी केले आहे.
नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
दूषित पाणी व उघडे पाणीसाठे यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.