Manwat Municipal Election campaigning
डॉ. सचिन चिद्रवार
मानवत : येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या येथील नगरपालिका निवडणुकीसाठी वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून उमेदवारांनी आपल्या आपल्या प्रभागात रॅली काढून शक्तीप्रदर्शनाने घरोघरी जाऊन मतदाराची प्रत्यक्ष भेट घेत निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. प्रचारामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असून शहरात बॅनरबाजीसह सोशल मीडियावर देखील आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहेत.
मानवतचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी अंकुश लाड व भाजप सेना युतीतर्फे सेनेच्या तिकिटावर अंजली महेश कोक्कर यांच्यात थेट लढत होत आहे. 11 प्रभागातील 22 जागांसाठी 56 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून बहुतांश सर्व प्रभागात दुरंगी व तिरंगी लढत होत आहे. फक्त प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक एक अ मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार खरात यांच्याविरोधात शिवसेनेचे शिलभद्र वडमारे, एक ब मध्ये शिवसेनेच्या सीमा सारडा यांना राष्ट्रवादीच्या अनुराधा वासुंबे लढत देत आहेत. प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये राष्ट्रवादीच्या कविता धबडगे यांची शिवसेनेच्या विभा भदर्गे यांच्याशी थेट लढत आहे. 2 ब मध्ये तीन उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादीच्या ज्योती आळसपुरे, शिवसेनेच्या शितल कुऱ्हाडे व भाजपचे बंडखोर ज्ञानोबा कच्छवे यांच्यात तिरंगी लढत आहे.
प्रभाग क्रमांक तीन अ मधून भाजपच्या शिवाजी पाटील यांना राष्ट्रवादीचे किशोर लाड यांचे आव्हान आहे. तर तीन ब मध्ये राष्ट्रवादीच्या नंदिनी मोरे यांना भाजपच्या शुभांगी कुऱ्हाडे व शिवसेना उबाठाच्या अनुराधा जाधव यांच्यात लढत आहे. प्रभाग क्रमांक चार अ मध्ये राष्ट्रवादीच्या द्वारका चौधरी यांना भाजपच्या शकुंतला चौधरी तर चार ब मध्ये भाजपचे शैलेंद्र कत्रूवार व राष्ट्रवादीचे सुरेशचंद्र काबरा यांच्यात तगडी फाईट असणार आहे.
प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये माजी नगराध्यक्ष गणेशलाल कुमावत यांना शिवसेनेचे विक्रमसिंह दहे यांनी चांगले आव्हान दिले असून पाच ब मध्ये भाजपच्या स्वाती पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वृषाली राहटे व शिवसेना उभाठाच्या ज्योती बारहाते उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका मीरा लाड यांच्या विरोधात शिवसेनेच्या दुर्गा दहे उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये सर्वात जास्त सात उमेदवार उभे असून यामध्ये राष्ट्रवादीचे संजयकुमार बांगड, शिवसेनेचे अण्णासाहेब बारहाते, भाजपचे बंडखोर उमेदवार शहराध्यक्ष संदीप हंचाटे, शिवसेना उबाठाचे नरेश गौड, गोविंद गहिलोत, बालाजी दहे व भारत कच्छवे या तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक सात अ मध्ये सेनेच्या अफ्रोज बागवान, काँग्रेसच्या हनिफाबी बागवान, राष्ट्रवादीच्या रेखा हलनोर यांच्यात तर 6 ब मध्ये राष्ट्रवादीच्या नियामत खान यांना सेनेच्या शेख नयुम चे आव्हान आहे. प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये राष्ट्रवादीच्या रफीयाबी बागवान, काँग्रेसच्या शिरीन बेगम कुरेशी तर सेनेकडून शेख जवेरिया तर 8 ब मध्ये राष्ट्रवादीचे सय्यद जमील यांचे विरोधात शिवसेनेचे मोहम्मद बिलाल बागवान व काँग्रेसचे सय्यद समीर रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 9 अ मधून डॉ अंकुश लाड यांच्या आई सुशीला लाड यांच्या विरोधात सेनेकडून बळीराम चव्हाण तर 9 ब मध्ये राष्ट्रवादीच्या भाग्यश्री शिंदे यांना शिवसेनेच्या जयश्री सोरेकर यांचे आव्हान असणार आहे.
प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये राष्ट्रवादीच्या रूपाली उगले, भाजपच्या ज्ञानेश्वरी रासवे तर 10 ब मध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ अंकुश लाड यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोलाईत यांच्यातील लढत लक्षवेधी ठरत आहे. शेवटचा प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ देवयानी दहे यांच्या विरोधात भाजपकडून पूजा देशमुख तर 11 ब मध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीमध्ये शिवसेना उबाठा चे युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्या विरोधात भाजपचे राजेश मंत्री व लक्ष्मण सोळंके हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप
नगरपालिका निवडणुकीसाठी शहरात चांगलेच वातावरण तापले असून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली जात असून राष्ट्रवादीकडून व्हाट्सअप स्टेटसद्वारे शहरात केलेल्या विकास कामांच्या रिल्स टाकल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले ऍड किरण बारहाते यांनी नगराची पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष नेतृत्वावर आरोप करण्याचा सपाटा लावला आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने देखील आरोपाचे खंडन करीत सोशल मीडियावरूनच उत्तर दिले जात आहे. एकंदरीत मानवत नगरपालिकेची निवडणूक रंगतदार होत असून शेवटच्या दिवसात कोणता पक्ष प्रचारात आघाडी घेऊन डावपेच टाकण्यात यशस्वी होतो ते पहावे लागणार आहे.
बुधवारी चिन्ह वाटप
येथील नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी ता 26 सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार असून अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचारामध्ये आणखी रंगत येणार असून शहरात प्रचारासाठीचे भोंगे फिरणार असल्याने मतदारांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.