

NCP vs Mahayuti
मानवत: मानवत नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आज (दि. 21) दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारामध्ये थेट लढत होण्याचे निश्चित झाले. एकूण 11 प्रभागातील 22 सदस्यांसाठी नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात एकूण 56 उमेदवार आहेत.
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेले अॅड. रेश्मा किरण बारहाते व शितल गणेश कुऱ्हाडे या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी अंकुश लाड तर महायुती तर्फे शिवसेनेच्या तिकिटावर अंजली महेश कोक्कर या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्या असून त्यांच्यातच थेट लढत होणार आहे.
शहरातील एकूण 11 प्रभागातील 22 सदस्य पदासाठी निवडणूक होत असून नऊ जणांनी माघार घेतल्याने 22 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात उरले आहेत. प्रभाग क्रमांक 1 अ, ब, 2 अ, 3 अ, 4 अ, ब 5 अ, 6 अ, 7 ब, 9 अ, ब, 10 अ, ब व 11 अ या 14 ठिकाणी थेट लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 2 ब, 3 ब, 5 ब, 7 अ, 8 अ व ब, 11 ब या सात ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये सर्वात जास्त उमेदवार उभे असून या ठिकाणी सात उमेदवार रिंगणात आहेत.
सर्व जागावर एकाही पक्षाचे उमेदवार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदासह एकूण 22 प्रभागांपैकी 21 ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदासह 14 ठिकाणी, भारतीय जनता पक्ष युतीमध्ये आठ जागा सोडलेल्या असताना देखील दहा ठिकाणी रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये ज्ञानोबा कच्छवे व प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपचे शहराध्यक्ष संदीप हंचाटे हे भाजपच्या चिन्हावर शिवसेना उमेदवाराच्या विरोधात उभे आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष 4 , काँग्रेस 3 ठिकाणी तर फक्त 4 जागी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.