Iran Israel Conflict Petrol Crisis pudhari photo
परभणी

Iran Israel Conflict Petrol Crisis: इराण-इस्रायल संघर्ष; अफवांचा बाजार गरम, परभणीत इंधनासाठी झुंबड

Parbhani News: पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांब रांगा ; प्लास्टिक बाटल्यांतही इंधन साठवण्याचा प्रकार

Anirudha Sankpal

परभणी, पुढारी वृत्तसेवा :

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि.३) रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली.

इंधन टंचाईबाबत भीती

इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी हवाई हल्ले केल्याची तसेच इराणच्या तेल उत्पादन केंद्रांवर मोठे नुकसान झाल्याची चर्चा पसरताच इंधन टंचाईची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. या अफवांमुळे परभणी शहरातील तसेच जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

प्लास्टिक बॉटलमध्येही पेट्रोल भरून घेतले

अनेक वाहनधारकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल भरून घेतले. काहींनी तर प्लास्टिकच्या बाटल्या व कॅनमध्येही इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, स्थानिक प्रशासन व इंधन वितरकांकडून तातडीने इंधन टंचाईचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भारतात इंधन पुरवठा विविध स्रोतांमधून होत असल्याने तात्काळ टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृत्रिम टंचाईचा धोका

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल साठवणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. तसेच अनावश्यक साठेबाजीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते, अशीही सूचना अग्निशमन विभागाने दिली आहे. सोशल मीडियावरील अपुष्ट संदेश आणि व्हिडिओंमुळे भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले.

अफवा अन् झुंबड

काही तासांतच शहरातील अनेक पंपांवर गर्दी उसळली. यातच परभणी शहरातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल रांगा असतानाही संपल्याचे ऐकावयास मिळाले. दरम्यान, अफवांमुळे निर्माण झालेली ही झुंबड प्रशासनासाठी धडा ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT