

परभणी : येथील एका २५ वर्षीय युवकाची अमेरिकेतील शिक्षण प्रवेशाच्या प्रक्रियेदरम्यान अडकलेली सुमारे ५ लाख रुपयांची रक्कम तब्बल वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर परत मिळविण्यात परभणी सायबर पोलिसांनी उल्लेखनीय यश आले आहे. 'हायब्रीड शिक्षणा'च्या नावाखाली झालेल्या या प्रकारात विद्यार्थ्याला ५ हजार यूएस डॉलर (सुमारे ४.३३ लाख रुपये) परत मिळाले आहेत.
शहरातील कादराबाद प्लॉट परिसरातील सय्यद आसिम रौफ यांनी डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिकेत एम.एस. बिझनेस ॲनालिटिक्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी 'अडवॉय कन्सल्टन्सी' मार्फत अर्ज प्रक्रिया सुरू केली. संबंधित कन्सल्टन्सीकडून हायब्रीड (ऑनलाइन + ऑफलाइन) पद्धतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्याने ५ हजार यूएस डॉलर ऑनलाइन पद्धतीने पाठविले होते. ही रक्कम कन्सल्टन्सीमार्फत अविला युनिव्हर्सिटी (केन्सस सिटी, मिसुरी, अमेरिका) यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात अमेरिकेत पोहोचल्यानंतर संबंधित विद्यापीठाकडून नियमित (कम्पल्सरी) प्रवेश घ्यावा लागेल, अशी अट घालण्यात आल्याचे विद्यार्थ्याच्या लक्षात आले. हायब्रीड पद्धतीबाबत दिलेली माहिती प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सय्यद आसिम यांनी प्रवेश न घेण्याचा निर्णय घेत भरलेली रक्कम परत देण्याची मागणी केली होती. सुरुवातीला कन्सल्टन्सीकडून टाळाटाळ करण्यात आली.
रिटर्न फ्लाईट तिकिटाची माहिती दिल्यास तत्काळ पैसे परत करू, असे सांगण्यात आले होते, मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही रक्कम परत करण्यात आली नाही. जवळपास तीन महिने सतत पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी एप्रिल २०२५ मध्ये सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे, पोउपनि आदित्य लाकुळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे गोळा करत संबंधित कन्सल्टन्सीशी सातत्याने संपर्क साधला. कायदेशीर कारवाईबाबत सूचना देत विद्यार्थ्याची रक्कम परत करण्यासाठी दबाव आणण्यात आला.
सुरुवातीला प्रतिसाद न देणाऱ्या कन्सल्टन्सीने अखेर काही दिवसांपूर्वी ५ हजार डॉलरची संपूर्ण रक्कम परत केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर सेलच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चिकाटीमुळे विद्यार्थ्याला आर्थिक दिलासा मिळाला असून या यशस्वी कारवाईचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
विद्यार्थ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन
परदेशात शिक्षणासाठी अर्ज करताना कन्सल्टन्सीची विश्वासार्हता, विद्यापीठाची अधिकृत माहिती व प्रवेशाच्या अटी-शर्ती लेखी स्वरूपात पडताळून पाहाव्यात, असे आवाहन सायबर पोलिसांनी विद्यार्थ्यांना केले आहे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.