राजेश विटेकरांसारख्या कार्यकर्त्याला आपल्या राजकीय सोयीच्या समीकरणासाठी या रिंगणातून बाजुला करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी दिलेला शब्द कसोशीने पाळला आहे.  Ajit Pawar Rajesh Vitekar File Photo
परभणी

अजितदादांनी पाळला शब्द; विटेकरांच्या निष्ठेला फळ

महादेव जानकरांच्या उमेदवारीचा प्रयोग फसला, मात्र राजेशदादांना विधानपरिषद

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण देशपांडे

परभणी : लोकसभेच्या निवडणुकीत परभणी मतदारसंघासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या आपल्या कट्टर समर्थक राजेश विटेकरांसारख्या कार्यकर्त्याला आपल्या राजकीय सोयीच्या समीकरणासाठी या रिंगणातून बाजुला करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी दिलेला शब्द कसोशीने पाळला आहे. समर्थक राजेश विटेकरांऐवजी लोकसभेत महादेव जानकरांना परभणीतून उमेदवारी बहाल करण्याचा अजितदादांचा हा प्रयोग फसला. तरी ज्या विटेकरांना विधान परिषदेत पोचविण्याचा दिलेला शब्द निर्धाराने पूर्णत्वास नेण्याचे कामही अजितदादांनी केले आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी दोन जागा वाट्याला आल्यानंतर अजितदादांनी प्राधान्यांने राजेश विटेकर यांचे नाव निश्चित केले. त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्जही दादांच्या उपस्थितीत दाखल केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचे कामही अजितदादांनी केले आहे. परिणामी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची पकड भविष्यात आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

पुणेकरांनो पर्यटनाला जाताय? ही ठिकाणे ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद!ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी असलेले (कै.) उत्तमराव विटेकर हे त्याकाळी काँग्रेसचे आमदार राहिले होते. सोन पेठसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या वारकरी संप्रदायातील उत्तमरावांनी तेव्हाच्या सिंगणापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. साधारणतः ८० च्या दशकात ग्रामीणभागातून आलेल्या या नेतृत्वाने जिल्ह्यातील अनेक नवख्या पुढाऱ्यांना घडविण्याचे काम केले. त्यांच्याच या राजकीय वाटचालीचे बाळकडू त्यांचे चिरंजीव राजेश विटेकर यांना घरातूनच मिळालेले असल्याने उमेदीच्या वयातच राजकारणात प्रवेश केला.

अगदीच सेवा सोसायटी ग्रामपंचायत स्तरावरून कार्य करत काँग्रेसमध्ये युवक कार्यकर्ता ते प्रदेश पातळीवर युवक काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविण्याचे काम राजेश यांनी केले. ग्रामीण भागाशी असलेली नाळ घट्ट ठेवत कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ते वरच्या फळीत कार्यरत झाले. तब्बल १० वर्ष जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता राखताना स्वतः सह मातोश्रींना देखील अध्यक्षपद मिळवून देण्याचे काम विटेकरांनी केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार व त्यानंतर अजितदादांच्या सोबत एकनिष्ठेने काम करण्यास सुरूवात केली. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मजबुती आणण्याचे काम केल्यानंतर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांना प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खा. संजय जाधव यांना दिलेली निकराची लढत व त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संपादन केलेला विश्वास यामुळे विटेकरांना पुन्हा एकदा संधी निश्चीतच मिळेल, असे अपेक्षित होते.

या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर ते अजितदादांसोबत सक्रीय राहिल्याने परभणी लोकसभा मतदारसंघात त्यांनाच उमेदवारी मिळणार हेही निर्निवाद होते. नव्हे तसे कामाला लागण्याचे निर्देशच दस्तुरखुद्द अजित दादांनी दिलेले असल्यामुळे त्यांचे हे पाठबळ पाठिशी घेत राजेश विटेकरांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी करीत लोकसभा जिंकण्याचा निर्धार केला. अगदीच निवडणुकीचे कार्यालये देखील त्यांनी सुरू केले होते. मात्र राज्याच्या राजकीय हालचालीत अजितदादांनीच ही जागा रासपच्या महादेव जानकरांच्या पारड्यात टाकल्याने विटेकरांचा मोठा हिरमोड झाला. परंतू त्यांची ही तयारी व्यर्थ जाणार नाही. येत्या तीन महिन्यांत त्यांना विधानपरिषदेत पाठवू हा जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहिररित्या दिलेला शब्द पाळण्याचे काम अजितदादांनी केले आहे.

बारामतीचे गणित जुळविण्याच्या प्रयत्नात अखेरच्या क्षणी परभणीची आपली हक्काची जागा रासपच्या पारड्यात टाकण्याचे काम अजितदादांनी केले. महादेव जानकरांना अखेरच्या क्षणी येथील उमेदवारी दिली गेली. ओबीसी मतांच्या आधारे जानकरांनीही मोठ्या अट्टाहासाने ही जागा मिळविली. त्याचवेळी बारामतीसाठी राजेशदादांचा बळी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावल्याचे पाहून अजितदादांनी शब्दही दिला. त्याप्रमाणे विटेकरांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेत काम केले. मात्र लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा हा प्रयोग फसला गेला. महादेव जानकर पराभूत झाले. त्यामुळे विधान परिषदेच्या जागेकडे सर्वांचे लागलेले लक्ष विटेकरांच्या उमेदवारीने पूर्णत्वास नेण्याचे काम अजितदादांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT