बाळासाहेब पांडे
नायगाव : या वर्षीच्या पावसाळ्याने हवामानशास्त्रालाही चक्रावून टाकलं. एप्रिल-मे महिन्यात गटात न बसणाऱ्या उन्हाळ्यासोबत अनपेक्षित युती करून पावसाने शेतकऱ्यांना गोंधळात टाकलं. आणि अजून आश्चर्य म्हणजे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिवाळा सुरू होण्यापूर्वीच त्याच्याशीही हातमिळवणी केली. या "अनैसर्गिक युती"मुळे शेती, रस्ते, उत्पादन आणि जनजीवन यांचं प्रचंड नुकसान झालं.
पण हवामानातील या विचित्र संगतीचा विचार केला, तर राजकारणातील चित्रही फार वेगळं नाही. सत्तेच्या आकाशातही अशीच ढगांची लगबग सुरू आहे. कोण कोणासोबत आहे आणि किती काळासाठी, हे कोडं सर्वसामान्यांना अजूनही सुटलेलं नाही. पावसासारखं हे राजकीय वातावरण क्षणाक्षणाला रंग बदलणारं!
अनियमित पावसामुळे शेतकरी अक्षरशः गोंधळले आहेत. कधी पेरणीच्या वेळी दुष्काळाचा तडाखा, तर कधी काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा मारा. परिणामी, शेतीचं नुकसान, कर्जबाजारीपणा आणि उपजीविकेचा संकंट, सगळं एकत्र कोसळलं. राजकारणातही नेमकं असंच दृश्य दिसतंय. सत्ता मिळवण्यासाठी झालेल्या "पेरण्या" आणि निवडणुकीनंतर जनतेच्या "काढणी"चा हिशोब, दोन्हींचा तोल बिघडलेला दिसतो.
राज्याच्या सत्तेच्या आभाळात पुन्हा ढग जमले आहेत. सत्तांतर, पक्षफुट, राजकीय युती-व्युतींचा सगळा खेळ हवामानातील गडगडाटासारखाच सुरू आहे. पावसाने उन्हाळा आणि हिवाळ्यासोबत जशी युती केली, तशीच राजकारण्यांनी सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात असलेल्या विचारसरणीशीही केली. परिणाम जनतेच्या हिताचं नुकसान, विकासाच्या आश्वासनांचा तुटलेला कणा.
शेती उद्ध्वस्त, रस्ते पोखरलेले, रोजगारचं ओझं वाढलेलं, आणि प्रशासनाचा ताळमेळ ढासळलेला — हे सगळं "युती"च्या नावाखाली घडतंय. हवामान आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर अनिश्चिततेची झड लागली आहे, आणि तिचं ओझं सर्वात जास्त सामान्य नागरिकांवर पडलंय.
पावसाने जर एप्रिल-मे मध्ये उन्हाळ्याशी, आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळ्याशी युती करून राज्याचं नुकसान केलं असेल, तर राजकीय नेत्यांनी केलेल्या या "अनैसर्गिक युतीं"मुळे झालेलं नुकसान मोजायलाही आकडे अपुरे पडतील. म्हणूनच या युतींचा विचार न केलेलाच बरा, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.