

Kolhapur Local Body Election
बाबुराव जाधव
हातकणंगले : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात अनेकांच्या स्वप्नावर विरजण पडले असले, तरी अनेक ठिकाणी या आरक्षणाचे जल्लोषात स्वागत केले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. तालुक्यात ११ जिल्हा परिषद गट असून, रेंदाळ हा एक मात्र गट खुला राहिला आहे. कोरोची व कुंभोज महिलांसाठी खुला झाला आहे.
उर्वरित आठ गट हे आरक्षित असल्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांच्या स्वप्नावर अक्षरशः विरजण पडले आहे. त्यामुळे आपली प्रचार यंत्रणा थांबवली असली, तरी आपल्याच विश्वासू उमेदवाराची चाचपणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे हातकणंगले जिल्हा परिषद गणामध्ये चांगलीच चुरस होणार आहे.
यात प्रामुख्याने स्थानिक गटाऐवजी ही निवडणूक पक्षीय होणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुक्यामध्ये खा. धैर्यशील माने हे शिवसेना शिंदे गटाचे, तर विद्यमान आमदार हे जनसुराज्य पक्षाचे आहेत. इचलकरंजी मतदारसंघातील आ. राहुल आवाडे हे भाजपचे आहेत. त्यांची ताकद हातकणंगले तालुक्यातील १४ गावांमध्ये आहे.
आगामी निवडणुकीमध्ये स्थानिक आघाडींपेक्षा पक्षीय राजकारणाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. यातच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपले निकटवर्तीय यांना जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक रिंगणात उतरवून आपला हक्काचा उमेदवार मिळण्यासाठी अनेक मतदारसंघांवर उचला उमेदवार थोपवण्याचा प्रयत्नही करण्यास सुरुवात केली आहे. याला स्थानिक राजकारणातून प्रखर विरोध केला जात आहे. यामुळे याचा फटका अनेकांना बसणार आहे. स्थानिक नेत्यांनाही उचली उमेदवारी नको असल्याची चर्चा आहे; मात्र पक्षीय धोरणामुळे त्यांनाही गप्प बसण्याव्यतिरिक्त पर्याय नसल्याने हा प्रयोग तालुक्यात अनेक ठिकाणी केला जाणार आहे.
तसेच आ. अमल महाडिक यांचीदेखील तालुक्यात चांगलीच पकड आहे. माजी आ. राजू आवळे यांचाही तालुक्यात एक मोठा गट सक्रिय आहे. माजी आ. राजीव आवळे यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुक्यात दिसत आहे. संपर्क जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यामार्फत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद तालुक्यात पाहावयास मिळते. त्यामुळे तालुक्यात सर्वच पक्ष ताकद दाखवण्यासाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी सज्ज आहेत.