

नांदूरशिंगोटे : प्रकाश शेळके
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदूरशिंगोटे गट आणि गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दीपावली सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देत-घेत भेटीगाठींचा सिलसिला सुरू असून, या माध्यमातून अनेक इच्छुकांनी मतदारांच्या नाडीची चाचपणी सुरू केली आहे.
नांदूरशिंगोटे गटाची जागा यंदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. तर नांदूरशिंगोटे व पांगरी गणाची जागा सर्वसाधारण असल्याने येथेही अनेकांनी उपस्थिती दर्शवायला सुरुवात केली आहे. सिन्नरच्या राजकारणात नांदूरशिंगोटे आणि दोडी या गावांचा नेहमीच निर्णायक प्रभाव राहिला असून, या दोन्ही गावांतील मतदार हे निवडणुकीचे गणित बदलण्याची क्षमता ठेवतात.
यापूर्वी नांदूरशिंगोटे गटातून जिल्हा परिषदेत सुरेश गर्ने मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतर बाळासाहेब वाघ, नीलेश केदार, तसेच शोभा दीपक बर्के यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यामुळे यावेळी जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या गटात आणि गणात बाळासाहेब वाघ, मंगेश शेळके, विलास पांगारकर दीपक बरके यांनी यापूर्वी निवडणुकांमध्ये सहभाग घेतला असून, पूर्व भागातील मतदार त्यांना चांगले ओळखतात. सध्या गट-गण परिसरात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. काही ठिकाणी मतदार 'जो योग्य ठरेल त्यालाच साथ' अशा दबक्या आवाजातील चर्चामध्ये व्यस्त आहेत.
नाक्या-नाक्यावर उमेदवारांच्या चर्चांनी ज्वर चढला असून, अनेक संभाव्य उमेदवार दीपावलीच्या मुहूर्तावर सामाजिक संबंध दृढ करताना दिसत आहेत. मात्र अजून 'पुलाखालून बरेच पाणी वाहायचं' असल्याने, कोणत्या गटाकडून आणि कोणत्या पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरेल, हे निश्चित व्हायचे आहे. तरीही नांदूरशिंगोटे गटात सध्या राजकीय रंगत निर्माण झाली असून, एक प्रकारे 'रंगीत तालमी'ला सुरुवात झाली आहे, असेच म्हणावे लागेल. प्रत्येक इच्छुक आपले नाव निश्चित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.
अलीकडच्या काळात स्थानिक राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर अनेक जुने तसेच नवे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नांदूरशिंगोटे आणि दोडी परिसरातील ही आगामी निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार, अशी चर्चा सध्या सिन्नर तालुक्याच्या राजकीय वतुर्कात सुरू आहे.
पांगरी गणावर चुरस
पांगरी गणात उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या गणातून संदीप शिंदे, कानिफनाथ घोटेकर आणि अमित घोटेकर या इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आहेत. या गणाचे यापूर्वी प्रतिनिधित्व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक रवींद्र पगार यांनी केले होते. त्यांच्या कार्यकाळानंतर आता या जागेवर कोण नवा चेहरा पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्तरावर पक्षांतर्गत समीकरणांमुळे या गणातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रंजक समीकरणाचे कुतूहल
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये एक रंजक समीकरण पाहायला मिळाले होते. दोडी गावाकडून जिल्हा परिषदेचा उमेदवार देण्यात आल्यास नांदूरशिंगोटे गाव पंचायत समितीसाठी उमेदवार देते आणि उलट परिस्थितीतही तेच घडते. त्यामुळे या गट-गणातील दोन्ही गावांतील राजकीय हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
यांच्या नावांभोवती चर्चेचा फेर
या गट-गणात होणाऱ्या निवडणुकीत छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, निवृत्त पोलिस निरीक्षक विलास सानप, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाघ, मार्केट कमिटीचे संचालक रवींद्र शेळके, माजी सरपंच गोपाळ शेळके, दीपक बर्के, सरपंच शोभा बरके यांची नावे पुन्हा चर्चेत आहेत. तसेच नवीन चेहऱ्यांमध्ये सुखदेव आव्हाड, भारत दराडे, अरुण शेळके, संजय आव्हाड आदींचाही समावेश आहे. दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कार्यकर्ते लक्ष्मणराव शेळके यांचे चिरंजीव मंगेश शेळके हेही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.