मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीनंतर हा निर्णय घेताना आयोगाने मुंबईसह पुणे व नागपूर या ‘अ’ वर्गाच्या महापालिकांची निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला 15 लाख रुपयापर्यंत खर्चाची मर्यादा आखून दिली आहे; तर ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवाराला 13 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.
निवडणूक आयोगाने तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब वेळोवेळी देणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा
(अ वर्ग) मुंबई, पुणे आणि नागपूर : 15 लाख रुपये
(ब वर्ग ) नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड : 13 लाख रुपये
(क वर्ग) कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर,
वसई-विरार : 11 लाख रुपये
उर्वरित ड वर्ग 19 महापालिका : 9 लाख रुपये