नांदेड

Nanded news | पैनगंगा अभयारण्यात ‘ज्युली’चे दर्शन; जंगल सफारीला पर्यटकांची वाढती पसंती

वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा अनुभव पर्यटकांना निसर्गाशी अधिक घट्ट नाते जोडून देत आहे

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत भागवत

उमरखेड : निसर्गसंपन्न वातावरण, वन्यजीवांची मुक्त संचार करणारी दुनिया आणि थरारक अनुभव यामुळे सध्या पैनगंगा अभयारण्य येथे जंगल सफारीची क्रेझ वाढताना दिसत आहे. सुट्यांच्या काळात तसेच विकेंडला अनेक हौशी पर्यटक अभयारण्याला भेट देत असून वन्यजीवांचे जवळून दर्शन घेण्याचा आनंद लुटत आहेत.

अभयारण्यात नुकतीच सोडण्यात आलेली ‘ज्युली’ ही वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सफारीदरम्यान पर्यटकांना तिचे दर्शन घडत असल्याने वनप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथील डॉ. नेहा राठोड व संदीप चव्हाण यांच्या परिवाराने नुकतीच पैनगंगा अभयारण्यात जंगल सफारी केली. यावेळी त्यांना जंगलातील नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरणाऱ्या ‘ज्युली’ वाघिणीचे थरारक दर्शन झाले. वाघीण अगदी जवळून दिसल्याने संपूर्ण परिवार रोमांचित झाला. त्यांनी हा अनुभव “अविस्मरणीय आणि निसर्गाशी जवळीक साधणारा” असल्याची भावना त्यांनी केली.

वन विभागाच्या प्रयत्नांमुळे अभयारण्यात वन्यजीव संवर्धनाला चालना मिळत असून पर्यटकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक सफारी अनुभव उपलब्ध होत आहे. घनदाट जंगल, विविध पक्षी, वन्यप्राणी आणि आता कधी वाघाचे तर कधी, वाघिणीचे सहज दर्शन होत असल्याने, पैनगंगा अभयारण्य विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून पुढे येत आहे. जंगल सफारीमुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळत असून निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृतीही होत आहे. वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा अनुभव पर्यटकांना निसर्गाशी अधिक घट्ट नाते जोडून देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT