

पलूस ः सागरेश्वर अभयारण्य सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गवत व झुडपे कोरडी पडलेली असली तरी नुकतीच फुटलेली चैत्री पालवी परिसराला नवचैतन्य देत आहे. या पार्श्वभूमीवर अभयारण्यात हरणांचे मुक्तपणे फिरणारे कळप सहजपणे पाहायला मिळत असल्याने पर्यटक, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी ठरत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर दाट झाडीमुळे वन्यप्राण्यांचे दर्शन दुर्मीळ होते. त्यामुळे अनेकदा पर्यटक नाराज होतात. मात्र सध्या हरणांचे कळप सहज दिसत असल्याने विद्यार्थी, पालक व पर्यावरणप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी सुनील गुरव यांनी केलेे.
उन्हाळा असतानाही अभयारण्यात वन विभागाकडून प्राणी व पक्ष्यांसाठी मुबलक पाणी व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाला मोठी मदत होत आहे. यशवंतराव चव्हाण वन्यजीव अभयारण्य या नावानेही ओळखले जाणारे हे अभयारण्य महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. कडेगाव, वाळवा व पलूस तालुक्यांच्या सीमेवर वसलेले हे अभयारण्य सुमारे 10.47 चौ. कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे. तासगाव-कराड मार्गावरील ताकारीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
धो. म. मोहिते यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून सागरेश्वर डोंगरावर वृक्षलागवड करून या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. पूर्णपणे कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेले हे जंगल आज वन्यजीवांचे आश्रयस्थान बनले आहे. अभयारण्यात सांबर, काळवीट, हरण, कोल्हे, लांडगे, मोर, ससे तसेच विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात. त्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देत आहेत. निसर्ग पर्यटनाचे हे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.