मुखेड: पावसाळ्यात गटारांचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुखेड नगर परिषदेच्या वतीने शहरात व्यापक मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. नगराध्यक्षा विजया देबडवार यांच्या आदेशानुसार आणि मुख्याधिकारी तथा तहसीलदार विकास बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. पावसाचे पाणी सुरळीत वाहून जावे, नाले तुंबून पाणी रस्त्यावर येऊ नये आणि संभाव्य रोगराईला आळा बसावा, यादृष्टीने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
शहरातील मुख्य मार्गांसह अंतर्गत नाल्यांची सफाई करणे गरजेचे असल्याने, सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवकांनी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला सारले आहेत. विकासाच्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या मुद्द्यावर सर्वच नगरसेवकांनी एकत्र येत या मोहिमेला पूर्ण पाठबळ दिले आहे. नगरसेवक केवळ मोहिमेत सहभागीच झाले नाहीत, तर आवश्यक त्या ठिकाणी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शनही करत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या सक्रियतेमुळे स्वच्छता मोहिमेला एक नवी ऊर्जा मिळाली आहे.
सध्या कडक उन्हाळा असतानाही नागरिकांच्या आरोग्यासाठी नगर परिषदेची संपूर्ण यंत्रणा चिकाटीने कार्यरत आहे. या मोहिमेत सौ. विजया देबडवार आणि सर्व नगरसेवक स्वतः सक्रिय झाले आहेत. स्वच्छता अभियंता विद्याधर घोरपडे, स्वच्छता निरीक्षक मार्तंड वनंजे, स्वच्छता प्रमुख बलभीम शेंडगे यांच्यासह नगर परिषदेचे सर्व सफाई कर्मचारी उन्हाची तमा न बाळगता काम करत आहेत.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन "नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करावे. गटारांमध्ये कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग किंवा इतर टाकाऊ साहित्य टाकू नये. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडीचा किंवा जवळच्या कचराकुंडीचाच वापर करावा."— नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक, मुखेड