Ratnagiri News : पीएनजी गॅस खोदाईवरून सभागृहात संताप

महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी घेतले फैलावर ; पावसात होणार गैरसोय
Ratnagiri News
पीएनजी गॅस खोदाईवरून सभागृहात संताप
Published on
Updated on

रत्नागिरी : घरगुती गॅस जोडणी देण्यासाठी महानगर कंपनीने अनेक ठिकाणी खोदाई करुन ठेवली आहे. परंतु प्रत्‍यक्षात जोडणी देण्यास विलंब होत आहे. पावसाळयाच्या तोंडावर खोदाई केलेल्या ठिकाणी रस्ता पूर्ववत न झाल्यास गैससोय होणार असल्याने रत्‍नागिरी नगर परिषदेच्या गुरुवारच्या सर्व साधारण सभेत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्‍याचवेळी जन्म, मृत्‍यू दाखल्यांसह सर्वसामान्यांच्या कामात होणाऱ्या विलंबामुळे सत्ताधारी शिवसेना, भाजप युतीच्या नगरसेवकांनी नगर परिषद प्रशासनावरच आगपाखड केली. दरम्यान प्रशासकीय इमारतीतील नुतन सभागृहाला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.

गॅस वाहिनीच्या खोदाईमुळे या सभेला महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. यासंदर्भातील आयत्‍या वेळेच्या विषयांवेळी शिवसेना, भाजपचे प्रदीप उर्फ बंडया साळवी, सौरभ मलुष्टे, राजन शेटये, अमित विलणकर, स्मितल पावसकर, आदींनी गॅस वाहिनी टाकण्यासाठी रस्त्‍याच्या कडेला केलेल्या खोदाईवर जोरदार आक्ष्ेप घेतले. अनेक ठिकाणी खोदाई करुन ठेवण्यात आली आहे. परंतु जोडणी मात्र वेळेत मिळत नाही. पाऊस तोंडावर आला आहे. पावसाळयात सगळीकडे चिखल होणार आहे. चारचाकी वाहनांना जाता येत नाही. अनेक इमारतींच्या समोर असलेल्या खोदाईमुळे नागरीकांना येणे-जाणे कठीण होत आहे. काम कधी पूर्ण होणार ? जोडण्या कधी देणार? अशा अनेक प्रश्नाचा भडीमार करण्यात आला.

कंपीनीचे अधिकारी तसेच नगर परिषद अधिकारी, नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने लक्ष द्यावे, नागरीकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी सूचना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी केली. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवडयामुळे पीएनजी जोडण्या देण्याबाबत वरीष्ठ पातळीवरुन सक्त आदेश असल्याचे मुख्याधीकारी वैभव गारवे यांनी सांगितले. त्‍याचवेळी या संदर्भात योग्य नियोजन करण्याच्या सुचना करत १५ दिवसात हे काम संपवावे असे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. जेसीबीने खोदाई केली जात असल्याने जलवाहिन्या फुटत आहेत. त्‍यामुळे ब्रेकरने खोदाई व्हावी अशी सूचना सभापती निमेश नायर यांनी केली.

जन्म, मृत्‍यूचे दाखले मिळवण्यासाठी नागरीकांना अनेक फेऱ्या माराव्या लागतात. जिल्हा रुग्णालय नगर परिषदेच्या हद्‌दीत असल्यामुळे जन्म, मृत्‍यू दाखले रत्‍नागिरी नगर परिषदेकडून मिळतात. शहराबाहेरुन येत असलेल्या गरीब नागरीकांना गाडी भाडे , खाणे -पिणे धरुन ४०० ते ५०० रु खर्च होतो. अशा गरीबांना फेऱ्या मारायला लावण योग्य नसल्याचे नगरसेवक बंडया साळवी यांनी सांगितले. हाच विषय वेगवेगळया पद्धतीने सुहेल मुकादम, अमित विलणकर यांनीही अनुभवासह मांडला. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि मुख्याधिकारी गारवे यांनी मनुष्य बळ आणि आवश्यक तांत्रिक सामुग्री तातडीने वाढवून जन्म, मृत्‍यू दाखल्यांसंदर्भातील कागदपत्रे संगणकावर ४ दिवसात अपलोड करुन घेण्यास सांगितले. नगर परिषदेवर प्रशासक असताना गतीमान कारभार होता. नगरसेवक आल्यानंतर प्रशासनात मरगळ का आली आहे असा खोचक सवाल सभापती खेडेकर यांनी उपस्थित केला. यापुढे अशी चालढकल खपवून घेणार नाही. आक्रमक व्हायला भाग पाडू नका , असा इशाराही दिला.

रत्‍नागिरी शहरात भूमिगत वीज वाहिनीच्या संदर्भातही महावितरणचे शहर उपकार्यकारी अभियंता सययद यांच्या कडून माहिती घेण्यात आली. नीधी उपलब्ध झाल्यानंतर तो नगर परिषदेकडे वर्ग झाल्यावरच खोदाईची परवानगी घेणार असल्याचे अभियंता सययद यानी सांगितले. नगरसेविका वर्षा ढेकणे, उपसभापती पुजा पवार यांनी सार्वजनिक उद्यानात चाललेल्या प्रेमचाळयांबाबत सभागृहाचे लक्ष वेधले नगराध्यक्षांनी सर्व उद्यानांत सीसीटिव्ही लावणाच्या सुचना प्रशासनाला केल्या. नगर परिषदेच्या नूतन सभागृहाला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news