

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आली असली तरी नगरसेवकांना प्रशासकीय ज्ञान कमी असल्यामुळे नामुष्की ओढावत आहे. त्यामुळे मंगळवारी मुंबईतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौरांसह आपल्या ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. कामकाज कसे चालवायचे याचे धडे देत त्यांना कानपिचक्या दिल्याचेही समजते.
वडाळ्यातील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा बहुमताअभावी नामंजूर झालेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तातडीचे कामकाज म्हणून महापौर रितू तावडे यांनी तो पटलावर ठेवला. परंतु यावेळी सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे की नाही याची शहानिशा केली नाही.
त्यामुळे सत्ता असूनही भाजपावर ही नामुष्की ओढावली. यामुळे मुंबईतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह वरिष्ठ नगरसेवकांची मंगळवारी भाजपाच्या दादर येथील पक्ष कार्यालयात शाळा भरवली होती. यावेळी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजपा नेते प्रवीण दरेकर व अन्य जेष्ठ नेते तसेच सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ नगरसेवक तसेच समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी सभागृहात उडणाऱ्या गोंधळाबद्दल नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेत सत्ता असताना पक्षावर नामुष्की ओढावून का घ्यायची, अशी विचारनाही यावेळी नेत्यांनी नगरसेवकांकडे केल्याचे समजते. अभ्यास करून एखादा निर्णय घेणे, योग्य ठरेल. घाई गडबडीत प्रशासकीय माहिती न घेता कोणताही निर्णय घेऊ नये, असा सल्लाही नेत्यांनी यावेळी दिला.
समन्वय ठेवण्याचा सल्ला
महापालिकेमध्ये भाजपा शिवसेनेची सत्ता असल्यामुळे समन्वय महत्त्वाचा असतो. भाजपामध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती व अन्य महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्ष, मित्रपक्ष शिवसेनेच्या गटनेत्यांशी समन्वय असायला हवा. सभागृहातील कामकाजाबाबत महापौर सभागृहनेता व स्थायी समिती अध्यक्ष एकत्र बसून रणनीती आखली पाहिजे, असा सल्लाही भाजप नेत्यांनी आपल्या नगरसेवकांना दिला.
ठाकरे गटाला वेळीच रोखा
शिवसेना ठाकरे गट 1997 पासून महापालिकेच्या सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक नगरसेवकांना प्रशासकीय कारभाराची माहिती आहे. त्यामुळे ते नेहमीच सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकतात. त्यामुळे त्यांना वेळीच रोखा, अन्यथा सत्ता असूनही नामुष्की ओढवण्याची वेळ येऊ शकते, याकडेही भाजप नेत्यांनी आपल्या नगरसेवकांचे लक्ष वेधले.