नांदेड

Nanded news | लेंडी प्रकल्पग्रस्तांना हक्काचे छप्पर: वळंकी गावातील १४७ लाभार्थ्यांना पारदर्शकपणे भूखंडांचे वाटप

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटिबद्ध – उपविभागीय अधिकारी, अनुप पाटील

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : लेंडी प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या तालुक्यातील वळंकी गावच्या प्रकल्पग्रस्तांसाठी अखेर शासनाकडून भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एका विशेष बैठकीत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अनुप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्यात आली. यावेळी वळंकी गावातील एकूण १५४ पात्र लाभार्थ्यांपैकी १४७ लाभार्थ्यांना लॉटरी (सोडत) पद्धतीने भूखंडांचे वाटप करण्यात आले.

पारदर्शक सोडत आणि अधिकार्‍यांची समजूत

बैठकीच्या सुरुवातीला वळंकी गावच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. यानंतर सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी 'नेहा गुडमे' या बालिकेच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. प्रक्रिया सुरू असताना सुरुवातीला काही लाभार्थ्यांनी भूखंड घेण्यास नकार दिल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी संवेदनशीलतेने प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि त्यांचे समाधान करून भूखंड वाटपाचा मार्ग मोकळा केला.

"प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असून, यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. भूखंड वाटपाची संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली आहे."
– अनुप पाटील (उपविभागीय अधिकारी)

विविध विभागांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती

ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज होती. या बैठकीला संकेत गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी) धनंजय राऊत (तहसीलदार) लक्ष्मणराव केंद्रे (पोलीस निरीक्षक) अभियंता भोयर व सुळकेकर (लेंडी प्रकल्प) श्रीमती सुभेदार व गिरी (महसूल सहाय्यक) यांच्यासह संबंधित भागाचे मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच वळंकी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही बैठक अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT