Parbhani News : स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची कोंडी

विविध कामांवर प्रश्नांचा भडिमार, शिवस्मारक प्रस्तावावर ठोस निर्णयाची मागणी
Parbhani News
Parbhani News : स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची कोंडीfile photo
Published on
Updated on

Parbhani Standing Committee Meeting

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत स्थायी समितीच्या बुधवारी (दि. १३) दुपारी २ वाजता झालेल्या सभेत प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना सदस्यांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विकासकामांतील दिरंगाई, अपूर्ण प्रकल्प आणि विभागीय समन्वयाचा अभाव या मुद्यांवरून वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी सदस्यांच्या आक्रमक भुमिकेनंतर विभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांच्या भडीमारावर उत्तरे देता न आल्यानेही संताप वाढला होता.

Parbhani News
विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर

स्थायी समितीच्या सभेस उपाध्यक्ष श्रीकांत भोसले विटेकर, महिला व बालकल्याण सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण सभापती पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती कौशल्याबाई तुकाराम शिंदे, शिक्षण व आरोग्य सभापती वैशाली पंकज जाधव-आंबेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ. संदीप घोन्शीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थायी समितीचे सदस्य माणिक हरकळ, अजित वरपूडकर, पांडूरंग खिल्लारे, भरत घनदाट, प्रसाद डासाळकर, करूणाबाई कुंडगीर, दिलीपराव देशमुख, संगिता थिटे उपस्थित होते. सभे दरम्यान अनेक सदस्यांनी विविध विभागांतील प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

विकासकामे वेळेत पूर्ण न होणे, निधीचा अपेक्षित वेगाने वापर न होणे तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे यावरून सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणामी काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या सभेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव होता. सदस्य माणिक हरकळ यांनी हा विषय उपस्थित करत येत्या दि.१५ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा ऐनवेळी चर्चेत घेण्यात यावा, अशी मागणी केली.

Parbhani News
Pratap Sarnaik : अयोध्येतील मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिराचे रूप बदलणार

याबाबत अध्यक्षा लता वाकळे यांना निवेदन सादर करत तातडीने आदेश निर्गमित करण्याची विनंती केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उडानशिवे यांनी जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन एका महिन्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले. मात्र या आश्वासनानंतरही सदस्यांनी प्रशासनाच्या गतीवर आणि पूर्वीच्या प्रलंबित कामांवर प्रश्न उपस्थित करत अधिक ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली.

शिक्षणासह बांधकाम विभागावरही ताशेरे

दरम्यान, शिक्षण, बांधकाम व आरोग्य तसेच इतर विभागांतील विविध मुद्यांवरही सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर लेखाजोखा मागितला होता. अनेक योजनांच्या अंमलबजावणीतील उशीर, शासकीय निधीचा वापर आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यावरून प्रशासनाला कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागले. या सभेमुळे जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाजातील गती आणि पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळणार की पुन्हा कागदोपत्री आश्वासनांपुरतेच मर्यादित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news