नांदेड

Nanded crime : नायगावचा संतापजनक प्रकार; ॲम्ब्युलन्स हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन, एक डॉक्टर निलंबित

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : इतर वृत्तपत्रांच्या सोबतीने 'पुढारी'ने वाचा फोडलेल्या प्रकरणात आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईमुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नायगाव ग्रामीण रुग्णालयात खाजगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढारीसह इतर वृत्तपत्रांनी उघडकीस आणल्यानंतर, आरोग्य विभागाने संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतेचिन कादरी यांना निलंबित केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेरके यांनी प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता, चौकशीअंती हा प्रकार समोर आला. कर्तव्यात कसूर व आरोग्य विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. पेरके यांनी दिली.

नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही, नियमबाह्य पद्धतीने खाजगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन करण्यात आल्याचा प्रकार पुढारीने छायाचित्रांसह प्रसिद्ध केला होता. या वृत्तानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती आणि आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी सुरू केली. चौकशीअंती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, अन्य दोघांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे दैनिक पुढारीसोबत बोलताना सांगण्यात आले. या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून, ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभार, नियोजनाचा अभाव आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. दरम्यान, या घटनेपुरतीच कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या इतर संबंधितांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुन्हा एकदा टेंभुर्णी येथे विहिरीत पडून आत्महत्या केलेल्या प्रेताचे शेतात जाऊन शवविच्छेदन केल्याची चर्चा होत आहे. याविषयी विचारले असता, मृत व्यक्तीची बॉडी सडली असेल व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परवानगीने शवविच्छेदन शेतात जाऊन करता येते, असा खुलासा डॉ. पेरके यांनी दिला. यामुळे याचे "राज" "कारण" थांबले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT