Nanded Bird Checklist pudhari
नांदेड

Nanded Bird Checklist: नांदेड जिल्ह्याच्या पक्षी यादीत सहा नव्या प्रजातींची भर; धर्माबाद परिसरात १७६ हून अधिक पक्षीप्रजातींची नोंद

पक्षी सप्ताहात धर्माबादच्या पक्षीवैभवाची दिवाळी.!

Anirudha Sankpal

धर्माबाद: पुढारी वृत्तसेवा

दिवाळीच्या सुटीनिमित्त स्वगावी आलेले महाराष्ट्र वनविभागातील वनरक्षक व पक्षीनिरीक्षक मनेशकुमार सज्जन यांनी धर्माबाद तालुक्यातील विविध तलाव, पाणथळ जागा, गोदावरी नदीकाठ आणि नैसर्गिक अधिवासांमध्ये पक्षीनिरीक्षण करून परिसरातील समृद्ध पक्षीवैभवाची नोंद केली. रामपूर, रामेश्वर, बाळापूर, रत्नाळी, आतकूर, येताळा आणि सिरजखोड परिसरात केलेल्या निरीक्षणादरम्यान १७६ हून अधिक पक्षीप्रजाती आढळून आल्या.

स्थानिक पक्षांसोबत स्थलांतरित पक्षांचाही समावेश

या नोंदीमध्ये स्थानिक अडई बदक, चक्रवाक, घनवर, टिबुकली, पाणकवळे, विविध बगळे, वारकरी, काळी पाणकोंबडी, नदीसुरय, छोटा अर्ली, सुगरण, कबुतर, कावळा, चिमणी, पोपट, निलपंख, वेडा राघू, शिक्रा, कोतवाल, रानखाटीक आणि मोर यांसारख्या स्थानिक पक्ष्यांसोबत चक्रांग बदक, सोनूला, मोठी लालसरी, छोटी लालसरी, शेंडी बदक, सामान्य पाणलावा, काळ्या शेपटीचा पाणटिलवा, चिखली तुतारी, छोटा टिलवा, भांडखोर पाणलावा, पावशा, चातक, पीयमोज वटवट्या, काळा थिरथिरा आणि तपकिरी खाटीक यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचीही नोंद झाली.

मनेशकुमार १५ वर्षापासून सेवेत

मनेशकुमार सज्जन मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्र वनविभागात सेवा बजावत असून सध्या वन संशोधन केंद्र, वर्धा येथे कार्यरत आहेत. वनसेवेतील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासला आहे. दिवाळीच्या सुटीतही त्यांनी आपला वेळ निसर्ग आणि पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी दिला.

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर तलावावर कास्यपंखी कमळपक्षी (Bronze-winged Jacana) आणि लांबशेपटाचा कमळपक्षी (Pheasant-tailed Jacana) या दोन आकर्षक पाणपक्ष्यांची विशेष नोंद झाली. विशेष म्हणजे या दोन्ही पक्ष्यांची पिल्लेही मोठ्या संख्येने आढळून आली.विविध पट्ट्यांमध्ये मिळून १०० पेक्षा अधिक जकाना पक्षी आढळले.

सहा नव्या पक्षीप्रजातींची नोंद

तलावातील पाणवनस्पती, मुबलक खाद्यस्रोत आणि सुरक्षित पाणथळ अधिवास त्यामुळे बाळापूर तलाव हा या पक्ष्यांसाठी महत्त्वाचा प्रजनन अधिवास असल्याचे संकेत मिळाले आहेत. धर्माबाद परिसरासोबतच नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांत केलेल्या पक्षीनिरीक्षणातून मनेशकुमार सज्जन यांनी सहा नव्या पक्षीप्रजातींची नोंद केली आहे.

यामध्ये मोठा करवानक (Great Thick-knee), शेवाळ पाठीची तीरचिमणी (Olive-backed Pipit), पाखुर्डी (Chestnut-bellied Sandgrouse), काळटोप वटवट्या (Eastern Orphean Warbler), बेलन्सची फटाकडी (Baillon's Crake) आणि साईक्सचा वटवट्या (Sykes's Warbler) यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात नोंद झालेल्या पक्षीप्रजातींची संख्या २४१ जिल्ह्यातील विविध नैसर्गिक अधिवासांमध्ये नियमित

महाराष्ट्रात दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जातो. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्ष्यांविषयी जनजागृती आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन केले जाते.

“पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण गरजेचे”

मनेशकुमार सज्जन म्हणाले, “धर्माबाद आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी पोषक नैसर्गिक अधिवास उपलब्ध आहेत. मात्र,तलाव, पाणथळ जागा, गवताळ प्रदेश आणि जंगल परिसर हे केवळ पक्ष्यांचे अधिवास नसून संपूर्ण परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.

नियमित पक्षीनिरीक्षणातून अनेक नवीन नोंदी समोर येऊ शकतात. विशेषतः स्थानिक नागरिक आणि तरुणांनी पक्षीनिरीक्षणाची आवड जोपासून आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT