Bird Migration | पक्ष्याचा इंग्लंड ते सैबेरिया आणि परतीचा ६,८०० मैलांचा प्रवास

नवीन हलक्या ट्रॅकरद्वारे पक्ष्याच्या स्थलांतराचा मार्ग प्रथमच नकाशावर
Bird Migration |
Bird Migration | पक्ष्याचा इंग्लंड ते सैबेरिया आणि परतीचा ६,८०० मैलांचा प्रवास
Published on: 
Updated on: 

लंडन : इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यापासून सैबेरियापर्यंत आणि तेथून पुन्हा परत असा ६,८०० मैलांचा (१०,९४३ किमी) थक्क करणारा स्थलांतर प्रवास करणाऱ्या एका ‘बार-टेल्ड गॉडविट’ (पाणटिटवीच्या कुळातील एक पक्षी) नावाच्या पक्ष्याचा मार्ग नवीन हलक्या वजनाच्या ट्रॅकर्सच्या मदतीने प्रथमच नकाशावर नोंदवण्यात आला आहे.

हिवाळ्याच्या महिन्यांत लाखो पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या इंग्लंडमधील ‘द वॉश’ या खाडी परिसरात हिवाळा घालवणाऱ्या ‘फिल’ नावाच्या या पक्ष्याने मध्य सैबेरियातील तैमिर द्वीपकल्पापर्यंत आणि तेथून पुन्हा परत असा प्रवास कसा केला, याचा मार्ग संवर्धकांनी उघड केला आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे संशोधकांना या पक्ष्याच्या प्रवासाचा मागोवा घेणे शक्य झाले आहे. या पक्ष्याला केवळ ६ ग्रॅम वजनाचा सौरऊर्जेवर चालणारा एक अतिसूक्ष्म ट्रॅकर बसवण्यात आला होता. हा ट्रॅकर पक्ष्याचे ठिकाण आणि वेग यांसारखी माहिती जवळच्या फोन टॉवरला पाठवतो आणि नेटवर्कच्या कक्षेत येईपर्यंत ही माहिती साठवून ठेवतो. ‘आरएसपीबी’चे किनारी सल्लागार जेफ क्यू म्हणाले की, ‘‘जानेवारीमध्ये आम्ही ‘द वॉश’ येथे ज्या पक्ष्याला टॅग लावले होते, त्याने हजारो मैलांचा प्रवास करून सैबेरिया गाठले आणि तो सुखरूप परतही आला, ही कल्पनाच थक्क करणारी आहे.’’

कबुतरापेक्षा किंचित मोठा आकार, लांब चोच आणि लांब पाय असलेल्या बार-टेल्ड गॉडविट पक्ष्यांचा मागोवा घेणे गेल्या तीन वर्षांत उपलब्ध झालेल्या या नवीन हलक्या वजनाच्या टॅग्जमुळे शक्य झाले आहे, असे त्यांनी ‘प्रेस असोसिएशन’ला सांगितले. या टॅग्जमुळे पक्ष्यांच्या उड्डाणावर किंवा हालचालींवर कोणताही परिणाम होत नाही. स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी टॅग लावलेल्या बार-टेल्ड गॉडविट पक्ष्यांच्या एका लहान गटातील ‘फिल’ हा एक पक्षी आहे. क्यू पुढे म्हणाले की, ‘‘या टॅगिंगमुळे हे पक्षी तिथे कसे जातात आणि परत कसे येतात, तसेच त्यांच्या प्रवासातील एकमेकांशी जोडलेल्या पाणथळ जागांचे महत्त्व काय आहे, हे आपल्याला सविस्तरपणे समजले आहे. हे पक्षी प्रत्यक्षात काय करतात, याकडे पाहण्याची नवी दृष्टी यातून मिळाली आहे.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.