illegal sand mining Pudhari
नांदेड

illegal sand mining nanded | डीवायएसपी पानेगावकरांचा पहाटेचा दणका; अंतरगावच्या अवैध वाळू साम्राज्यावर धाड

जेसीबी, दोन ट्रॅक्टर, हायवा आणि दुचाकींसह ७६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; दहा जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बिलोली उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम पानेगावकर यांनी रविवारी पहाटे अंतरगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर धडक कारवाई केली. या कारवाईत एक हायवा, दोन ट्रॅक्टर-ट्रॉली, एक जेसीबी, दोन दुचाकी आणि वाळूसह तब्बल ७६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे डीवायएसपी पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली कुंटूर व नायगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने ३१ मे रोजी पहाटे सुमारे १.२० वाजता अंतरगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रालगत छापा टाकला. यावेळी बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान घटनास्थळी एक हायवा, दोन ट्रॅक्टर-ट्रॉली, एक जेसीबी, दोन दुचाकी तसेच सहा ब्रास वाळू असा मोठा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून पंचनामा केला. जेसीबी चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने यंत्रणा पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहे.

या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हायवा चालक व मालक, ट्रॅक्टर चालक-मालक, जेसीबी मालक तसेच वाळू उपशात सहभागी असलेल्या दहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई नांदेडचे पोलिस अधीक्षक अभिजित कुमार (आयपीएस) व अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत डीवायएसपी श्याम पानेगावकर, पोलिस निरीक्षक अरविंद घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्लीकार्जुन कारामुंगे, उपनिरीक्षक गजानन तोटेवाड यांच्यासह कुंटूर व नायगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पोलिस अधीक्षकांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले असून, जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध यापुढेही कठोर मोहिम सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

जप्त मुद्देमाल

  • हायवा : ₹३२.१० लाख

  • ट्रॅक्टर-ट्रॉली (२) : ₹२०.१० लाख

  • जेसीबी : ₹२२ लाख

  • दुचाकी (२) : ₹२ लाख

  • ६ ब्रास वाळू : ₹३० हजार

  • एकूण जप्ती : ₹७६.५० लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT