

Major Blow to Sand Smugglers! Police Raids at Five Locations in Jalgaon District; Contraband Worth Lakhs Seized
जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या वाळू तस्करांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. जळगाव तालुका, एमआयडीसी, एरंडोल, धरणगाव आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाया करत पोलिसांनी अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि डंपर जप्त केले आहेत. या सर्व कारवायांमध्ये एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा गावालगत असलेल्या महर्षी कनव आश्रमासमोरील कच्च्या रस्त्यावर जळगाव तालुका पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी जयेश पांडुरंग ठाकरे (वय २४, रा. कानळदा) हा विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडला गेला. पोलिसांना घटनास्थळावरून ३,००० रुपये किमतीची १ ब्रास वाळू आणि ४ लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाची ट्रॉली असलेला निळ्या रंगाचा स्वराज ७४४ FE कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार शाम जोशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण संतोष पाटील करत आहेत.
जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडी ते वावडदा दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर एमआयडीसी पोलिसांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. सक्षम प्राधिकरणाची कोणतीही रॉयल्टी अथवा वाहतूक पास नसताना पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या डंपरमधून तब्बल ५ ब्रास अवैध वाळू चोरटी वाहतूक करताना आढळून आली. या कारवाईत १०,००० रुपये किमतीची वाळू आणि ८ लाख रुपयांचा डंपर असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक मुकेश शिवदास सोडे (वय ४०, रा. वाघ नगर, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे करत आहेत.
तिसरी कारवाई :
एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडके बुद्रुक ते खर्ची रोडवरील जय मल्हार वॉटर सप्लाय समोर पोलिसांनी सकाळी ११.१० वाजण्याच्या सुमारास एका निळ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टरला एम एच 19 बी जी 55 90 ट्रॉलीसह अडवले. या ट्रॅक्टरमधून दीड ब्रास अवैध वाळूची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ६,००० रुपयांची वाळू आणि ४ लाख रुपयांचा ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नथ्थू कोळी यांच्या फिर्यादीवरून वाहन मालक भिमराज त्र्यंबक कोळी आणि चालक सुनिल भास्कर मोरे (दोघे रा. रवंजे बु|| ता. एरंडोल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक अनिल अशोक मोरे करत आहेत.
चौथी कारवाई
धरणगाव पोलिसांनी सातखेडा फाट्याजवळ सार्वजनिक जागी कारवाई करत गिरणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 19 इ व्ही 1652 पकडले. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता ६,००० रुपये किमतीची दीड ब्रास वाळू चोरून नेली जात होती. पोलीस कॉन्स्टेबल विनोद उत्तम चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चालक प्रेमराज जिजाबराव पाटील (वय ३९, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे करत आहेत.
पाचवी कारवाई :
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी भोजे गावाच्या बाहेर ५०० मीटर अंतरावर पिंपळगाव हरे रोडवर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई केली. एका टाटा कंपनीच्या डंपरमध्ये क्रमांक एम एच 20 सि टी ६८२९ विनापरवाना बेकायदेशीरपणे तब्बल ४ ब्रास वाळू भरून चोरटी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी २०,००० रुपये किमतीची वाळू आणि १० लाख रुपयांचा डंपर असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल सागर भाऊराव पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक अतुल मदनसिंग परदेशी (वय २५) आणि शुभम गुजर (दोघे रा. पुनगाव, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजारा करत आहेत.