

नगर: पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात क्रॉस रेडच्या दणक्याने अवैध धंद्यावाल्याचे कंबरडे मोडले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 990 क्रॉस रेड करून 3 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, 1188 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस अधीक्षकांच्या क्रॉस रेडचा पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही धसका घेतला आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एक महिन्यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर लगेच पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती आणि जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे फार्मन सोडले. तरीही छुप्या मार्गाने अवैध धंद्दे सुरू असल्याची खबर पोलिस अधीक्षकांच्या कानापर्यंत आली. पोलिस अधीक्षक स्वतंत्र विशेष पथक तयार करून कारवाई करतील, असे बोलले जात होते. मात्र, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी वेगळाच फंडा वापरला. तो कोणाच्याही ध्यानी मनी नव्हता. तो फंडा म्हणजे ‘क्रॉस रेड’.
अनेकदा स्थानिक पोलिसांच्या वरदहस्तामुळे विशेष पथक कारवाईसाठी गेल्यानंतर बातमी लिक झाल्याने अवैध धंद्यांवर कारवाई करणे कठीण होते. हाच लपंडाव मोडून आणि अचूक कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी अत्यंत गोपनीयतेने क्रॉस रेड योजना आखली. एका पोलिस ठाण्याचे कर्मचारी दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी जात असून, त्यात अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे.
त्यातील 35 पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी अनेक जुगार अड्डे, बिंगो जुगार अड्डे, गांजा तस्करी, गोमांस तस्करी, कत्तलखाने, अवैध दारू विक्री, वाळू चोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. 1 ते 30 पर्यंत जिल्ह्यात क्रॉस रेड सुरू 990 अवैध धंद्यांचा पदार्फश केला असून, त्यात तीन कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून 1188 जणांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटखा, मावा, जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी, वाळू, ट्रक्टर, रोकड, लोखंडी सत्तूर, चाकू, गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. आता अवैध धंद्यावाल्यांची गय नाही, असा सूर निघत आहे. पोलीस अधीक्षकांच्या या दणक्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत.
कारवायांची संख्या आणि जप्त मुद्देमाल
जुगार 83: 31,94,040
मटका 45: 1,65,845
दारू 700: 21, 74, 007
गुटखा 12: 1, 20,25,012
गांजा 20: 1,13,9014
वाळूचोरी 21: 1, 75, 27, 700
अवैध गोमांस 40ः 70, 26000
पिस्तूल 8: 1, 34, 300
8 पिस्तूले अन्1 7 काडतुसे हस्तगत
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार ‘क्रॉस रेड’च्या माध्यमातून एक महिन्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एक महिन्यात 8 पिस्तूल हस्तगत करून 17 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यात आठ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.