मराठवाडा

मुंडे बहिण भाऊ एकत्र वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध

अमृता चौगुले

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजीमंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले.

कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी नऊ मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या 21 जागेसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते तर 37 अर्ज मंजूर झाले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

बिनविरोध निवडून आलेले 21 उमेदवार

पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मीक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड ,चंद्रकेतू कराड ,शिवाजीराव गुट्टे ,शिवाजी मोरे ,सुधाकर सिनगारे ,सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे

कारखान्याचं हित महत्वाचं म्हणूनच बिनविरोध निवडीचा निर्णय : पंकजाताई मुंडे 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या हया परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी मिळून बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचं सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असंही त्या यावेळी म्हणाल्या.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT