मराठवाडा

Parbhani Crime: उखळद खून प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा; नरेंद्र पवार यांचा आरोप

अविनाश सुतार

परभणी, पुढारी वृत्तसेवा : उखळद येथे हिंसक जमावाने शिकलकरी समाजातील युवकाची निर्घृण केलेल्या खून प्रकरणात एफआयआर नोंदविताना तो अपूर्ण (Parbhani Crime) ठेवला. यामध्ये पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. या प्रकरणी आपण पोलिस प्रशासनास जाब विचारणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त जमातीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. नरेंद्र पवार यांनी आज (दि. 3) पत्रकार परिषदेत केला.

उखळद येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर माजी आ. पवार आज सकाळी शहरात दाखल (Parbhani Crime)  झाले. त्यांनी हत्या झालेल्या किरपानसिंग सुजितसिंग भौंड (वय17) या युवकाच्या कुटुंबियांचा भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्याबरोबरच त्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर या घटनेत जखमी झालेल्या एका युवकाची भेट घेवून प्रत्यक्ष घटनेची माहिती घेतली. या घटनेतील दुसरा जखमी युवक नांदेड येथे उपचार घेत आहे. माजी आ. पवार यांनी या सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

माजी आ.पवार म्हणाले, उखळद येथे जमावाने अत्यंत हिंसकरित्या शिकलकरी समाजाच्या युवकांना जाणीवपूर्वक मारहाण केली. जमावाने अत्यंत निर्घृण पद्धतीने केलेल्या या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. या समाजातील युवकांवर चोरीचा आळ घालून त्यांना बेदम मारहाण झाली. तेथील एका प्रार्थना स्थळातूनही या युवकांना मारण्याबाबत झालेली उद्घोषणा ही अत्यंत गंभीर बाब असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. काही बाबींचा एफआयआरमध्ये उल्लेखच झाला नाही. घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करताना विशिष्ट समाजाने जाणीवपुर्वक केलेल्या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.

सरकारलाही बदनाम करण्यासाठी उखळद येथील हा प्रकार नियोजनबद्धरित्या झाल्याची शक्यताही वर्तवित एफआयआर अत्यंत साध्या पद्धतीने नोंदविताना काही बाबी दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून यात असलेल्या अन्य काही आरोपींनाही अटक करण्यात यावी.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, भटके विमुक्तचे सरचिटणीस अशोक चोरमले, शिवाजी आव्हाड, बंडू मोहिते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक पिसाळ, शहर जिल्हाध्यक्ष किशनसिंग टाक, श्रीराम मुंडे, बाळासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT