Latur Rain : लातुरात अवकाळी पावसाने जनजीवन विस्‍कळीत, शेती कामांवरही परिणाम File Photo
लातूर

Latur Rain : लातुरात अवकाळी पावसाने जनजीवन विस्‍कळीत, शेती कामांवरही परिणाम

लातूर शहर व जिल्‍ह्यात अवकाळी पावसाचा मारा सुरूच आहे. जिल्‍ह्यातील सर्वच महसुल मंडळात निर्धारित अंदाजापेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal rains disrupt normal life in Latur, impact agricultural activities

लातूर, पुढारी वृतसेवा

लातूर शहर व जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मारा सुरुच आहे. त्‍यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात पावसाचे पाणी थांबले असून, मशागत अन पेरणी कशी करायची? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. गेली १५ दिवस पहाता जिल्ह्यातील सर्वच महसुल मंडळात निर्धारीत अंदापेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

अनेक बॅरेजेस भरल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी लातूर शहरात मुसळधार पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत १९.७ मीमी असा सरासरी पाऊस जिल्ह्यात नोंदला गेला. तर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरी २०६ .५ मीमी पाऊस झाला आहे.

सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी लातूर शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शहरभर पाणीच पाणी झाले. लातूर शहरात गटाराची स्वच्छता बरोबर न झाल्याने शहरातील अनेक भागात तसेच रस्त्यावर पाणी थांबत आहे. अनेक वस्‍त्‍यांतही पाण्याचा शिरकाव झाला आहे. मंगळवारी दुपारी लातूर शहरात सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने रस्‍त्‍यावर पाणीच पाणी झाले.

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय ते दयानंद गेट या रस्‍त्‍याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. अशीच परिस्‍थिती अंबाजोगाई रोडवर असलेल्या पोलिस अधिक्षक कार्यालय ते द्वारकादास शामकुमार शो रुम व परिसरात दिसत होते. हा मार्ग प्रमुख रस्‍त्‍यांपैकी एक असून इथे सदा वर्दळ असते. मंगळवारी या रस्‍त्‍यावर सुमारे दोन फुट पाण्याचा थर होता. कारची चाके पाण्यात गेली होती. गाड्या मार्गस्थ करताना चालकांना कसरत करावी लागत होती.

पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी थांबत आहे. अपघात होत आहेत. पाण्यात गाड्या बंद पडत आहेत. दर पावसाळ्यात या समस्येला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत मनपा प्रशासनास वारंवार सांगुनही ही समस्या जैसे थे असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. जुन्या गावभागातही गटाराचे पाणी रस्‍त्‍यावर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जुन्या रेल्वे लाईनवर साकारण्यात येत असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख मार्गाचे काम गेली अनेक वर्ष संथगतीने सुरू असून या मार्गालगत खालील भागात असलेल्या रस्ता छोटी नदी भासत होता. या रसत्यावरुन चालणे कठीण झाले होते.

मंगळवारी सका‌ळपर्यंतचा तालुकानिहाय पाऊस

चाकूर २६.५, उदगीर २२.१, औसा २२, लातूर २१, निलंगा २०.४, रेणापूर २०.२, अहमदपूर १६.८, देवणी १४.६, जळकोट ६.८, शिरुर अनंतपाळ ५.५

१५ दिवसांत सरासरीच्या ३४ टक्के् पाऊस

वार्षिक सरासरीच्या जवळपास ३४ टक्के पाऊस मे महिन्यात झाला आहे. १४ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये २९ हेक्टरवरील जिरायत, २५ हेक्टरवरील बागायत आणि जवळपास ४६ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच ५ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच १०२ जनावरे मृत्युमुखी पडली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT