

Beed Kej Youth Beaten One youth killed
केज : केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन तरुणांना त्यांची मोटार सायकल अडवून शेतातील झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे (वय २७, रा. भाटुंबा, ता. केज) व त्याचा मित्र सचिन करपे याला सोमवारी (दि. २६) दुपारी ४.३० च्या सुमारास सावळेश्वर (ता. केज) येथील रोहन मरके, सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून रोहन मस्के याच्या मामाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्याला झाडाला बांधून लाकडी काठी आणि बेल्टने अमानुषपणे मारहाण केली.
त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले. तसेच याची माहिती मारहाण करणाऱ्यांनी ज्ञानेश्वर धपाटे याच्या मोबाईलवरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला दिली. त्यानंतर सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी ज्ञानेश्वर आणि सचिन करपे याला अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल केले. त्या नंतर काही वेळाने ज्ञानेश्वर धपाटेला डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे याच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे करीत आहेत.