मुसळधार पावसामुळे जळकोट डोंगरी तालुका जलसंकटात सापडला Pudhari
लातूर

Jalkot Taluka Flood | अतिवृष्टीमुळे जळकोट तालुका जलसंकटात, वाहतूक ठप्प, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Latur Rain | जनतेने धैर्य ठेवावे, चुकीचा मार्ग अवलंबू नका : आमदार संजय बनसोडे

पुढारी वृत्तसेवा

Jalkot rainfall crisis

जळकोट : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळकोट डोंगरी तालुका जलसंकटात सापडला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तिरुका, मरसांगवी आणि बेळसांगवी परिसरात तिरु नदीने रौद्र रूप धारण केले आहे. बेळसांगवी येथे शेतांमधील पाईपलाईन व विद्युत मोटारी वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. करंजी गावाजवळील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने वेगाने पाणी वाहत असून शेतजमिनींचे मोठे नुकसान होत आहे.

वाहतूक ठप्प

जिरगा–ढोरसांगवी–धामणगाव, माळहिप्परगा–पाटोदा खुर्द, शेलदरा–वडगाव–होकर्णा–केकतसिंदगी, जगळपूर बु–कुमठा–शिवनखेड, घोणसी–अतनूर, जळकोट–सोनवळा–बेळसांगवी–वाढवणा बु, वायगाव–कुमठा–धामणगाव, मेवापूर–अतनूर, तसेच कंधार–जळकोट–उदगीर राष्ट्रीय महामार्ग या मार्गांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नुकसान आणि भीतीचे वातावरण

तिरुका येथे नदीवरील पुल पाण्याखाली गेला असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबली आहे. मरसांगवीत पूरपरिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि. 27) सकाळी जळकोट मंडळात 85 मिमी आणि घोणसी मंडळात 71 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रशासनाचा इशारा

पूरस्थिती पाहता तहसीलदार राजेश लांडगे यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे, शेताकडे न जाण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. "प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

बेळसांगवीत ड्रोन पाहणीची मागणी

तिरु नदीच्या पुरामुळे बेळसांगवी गाव पूर्ण वेढ्यात आले आहे. शेतकऱ्यांचे पाईपलाईन व विद्युत मोटारी वाहून गेल्याचे नुकसान झाले आहे. गावाची वाहतूक बंद असल्याने धोकादायक परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी ड्रोन पाहणी केली जाईल, अशी ग्वाही दिली.

जनतेने धैर्य ठेवावे – आमदार संजय बनसोडे

"जळकोट तालुक्यातील जनता संकटांचा मुकाबला करण्यास समर्थ आहे. त्यामुळे कुणीही हताश होऊन चुकीचा मार्ग अवलंबू नये. शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. सर्वांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे," असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT