लातूर

Latur news | सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार; चाकुरात विकासकामांच्या नावाखाली वाहतेय 'गटारगंगा'

वॉर्ड क्रमांक ८ मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; तातडीने उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मध्ये सुरू असलेल्या नाली बांधकामाचा स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यंत दुर्लक्षित कारभारामुळे नाल्यातील घाण पाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहू लागल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. असे असतानाही, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

२५ लाखांचे काम, पण नियोजनाचा बोजवारा!

या नालीतील सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून ३०० मीटर अंतराच्या आणि २५ लाख रुपये खर्चाच्या नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हे काम करत असताना सांडपाण्याचा नियमित प्रवाह आणि त्याच्या योग्य निचऱ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. नियोजनशून्य पद्धतीमुळे रस्त्यावरून सतत घाण पाणी वाहत आहे.

संतापजनक: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य ऐरणीवर

रस्त्यावर साचणाऱ्या या सांडपाण्यामुळे परिसरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाण पाण्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. विकासकामांच्या नावाखाली जर नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असेल, तर अशा कामांच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने पर्यायी मार्ग काढावा, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली आहे.

इंजिनिअर काय म्हणतात? "सदरील नालीचे वाहणारे घाण पाणी थांबवून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल आणि नागरिकांची गैरसोय तातडीने दूर केली जाईल."
— एम. एम. शेख, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
...नाहीतर आंदोलन करू "नालीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था का करण्यात आली नाही? या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या प्रचंड वाढल्या आहेत. कंत्राटदार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना ही गंभीर समस्या दिसत नाही का? विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना नरकयातना सोसाव्या लागत आहेत. प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मिटवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल."
— पप्पूभाई शेख, स्थानिक नागरिक, वॉर्ड ८, चाकूर.

जनता विचारतेय सवाल!

वॉर्ड क्रमांक ८ मधील रस्त्यांवर अवतरलेली ही 'गटारगंगा' थांबविण्यासाठी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन कधी जागे होणार? या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच अधिकारी हालचाल करणार का? असा संतप्त सवाल आता चाकूरकर उपस्थित करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT