

ठाणे: ठाण्याची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या ठाणे खाडी किनारी प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले असले तरी या प्रकल्पामुळे ठाण्यातील नसर्गिक नाले अतिशय अरुंद झाले आहेत.
पाण्याच्या निचरा करणाऱ्या या मार्गिकाच अरुंद झाल्या आहेत तर काही ठिकाणी या मार्गिका बंदच झाल्या असल्याचे तहसिलदारांच्या पाहणीत उघड झाले आहे. यावर तात्काळ उपाय योजना करण्यात आल्या नाहीत तर ठाण्याला पुराचा धोका वाढला असून अनेक गृहसंकुलांमध्ये हे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाण्यात वाहतूक कोंडीच्या दृष्टीने बाळकुम ते गायमुख या खाडी परिसरालगत कोस्टल रोड अर्थात खाडी किनारा प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून में. नवयुगा इंजि.कं.लि. यांचेमार्फत सुरु करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचा मार्ग हा कोलशेत खाडीलगत बृहन्मुंबई महानगपालिकेच्या जलवाहीनीस समांतर असा आहे.
या ठिकाणी प्रकल्पाच्या कामाकरीता साहित्याची ने-आण करण्याकरिता कच्चा रस्ता तयार करण्यात आला असून, या मार्गामध्ये एम.एम.आर.डी.ए मार्फत भरणी करण्यात आली आहे.
सदर भरणीचा आधार घेऊन ठाणे खाडी किनारा मार्गालगत दोन्ही बाजूला खाडीलगतच्या भागामध्ये खाजगी जमिनीवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज, रॅबिट,तसेच मातीची भरणी करण्यात आलेली आहे, ही भरणी अजूनही सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी कांदळवनाचे क्षेत्रात सुद्धा भरणी करण्यात आली आहे.
या भागातील वर्षानुवर्षाची नैसर्गीक पाणी निचरा करण्याचा व्यवस्था म्हणजे या भागातील खाडीलगत असलेली नाल्याचे मार्ग काही ठिकाणी अरुंद झालेले आहेत तर काही ठिकाणी बंद झालेले आहेत.
त्यामुळे यावर्षीच्या पावसाळयात डोंगराळ भागातून खाडीकडे येणाऱ्या पावसाळी पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे कोलशेत येथील लोढा अमारा ते मरीआई नगर, कोलशेत गाव तसेच दोस्ती वेस्ट वॉऊन्टी या गृहसंकुलांच्या परिसरामध्ये पावसाळी पाणी घुसून सदर भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण आहे.
कोस्टल रोडच्या सुरवातीपासून म्हणजेच खारेगांव खाडी लगत असलेल्या गणेश घाटापासून ते गायमुख खाडी बंदरापर्यंत संपूर्ण परिसराचे तहसीलदारांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.
या सर्व्हेक्षणात कोस्टल रोड प्रकल्प ज्या ठेकेदारास देण्यांत आलेला आहे.त्याने प्रकल्पाच्या अनुषंगाने सिमेंट क्राँक्रीटचे पिलर उभे करण्यासाठी जी तात्पुरती मार्गीका बनविलेली आहे. त्या मार्गीकेचा वापर स्थानिक शेतकरी व खाजगी लोक करत असतात व त्याचा वापर करतांना अनधिकृत भरणी देखील त्याच मार्गीकेने झालेली दिसून आलेली आहे.
जलमार्गांचा गळा घोटला
बाळकुम ते कोलशेत या खाडी घोडबंदर रोड राष्ट्रीय महामार्गापासून बाळकुम व कोलशेत या गावातून जाणारा मुख्य मोठा नाला याला खाडी लगत एकुण चार मार्गीका आहेत. त्या चारही मार्गीका कोस्टल रोडच्या बांधकामामुळे किंबहुना कोस्टल रोडच्या प्रकल्प उभारणीसाठी चालु असलेल्या इतर कामकाजासाठी थोडया प्रमाणात अरुंद करण्यात आलेल्या आहेत, या नाल्याची रुंदी ही किमान ५० फुटाची होती, परंतु ती आता १५ ते २० फुटावर आलेले आहे.
नाल्यांची रुंदी दिवसेंदिवस कमी होवून भविष्यात अरुंद नाल्यामुळे साठलेल्या पाण्याचा निचरा हा वेळेत न झाल्यास अतिवृष्टीमध्ये खारेगांव, बाळकुम, कोलशेत या खाडी लगत असलेल्या गावांमध्ये पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनधिकृत भरणी वाढली, पाण्याचा मार्ग बंद
मौजे-बाळकुम नाका ते मौजे कोलशेत तरीचा पाडा या खाडी लगत सर्वेक्षण करतेवेळी असे लक्षात आले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तानसा वैतरणा पाण्याच्या पाईप लाईन लगत केलेल्या रस्त्याचा वापर स्थानिक शेतकरी व खाजगी लोक करत असतात व त्याच रस्त्यावरुन अनधिकृत भरणीचे ट्रक हे वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
मौजे-बाळकुम ते कोलशेत या भागामध्ये खाडी किनारी बफर झोन सोडून ठाणे महापालिकेने अनेक रहिवासी तसेच वाणिज्य बांधकाम प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. त्याची संख्या पाहता ही किमान ५० ते ५५ मोठया इमारती आहेत. त्या इमारतीचे बांधकाम करताना संबंधीत विकासकाने तसेच जमीन मालकाने जमीनीचा विकास करताना खाजगी रस्ते तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच रस्त्यावर अनधिकृत भरणी करणारे ट्रक यांची वाहतुक देखील निदर्शनास आलेली आहे.