Renapur cattle market pudhari photo
लातूर

Renapur cattle market | बैल बाजार : दीड वर्षात अवघ्या दोन-अडीचशेच बैलांची विक्री

रेणापूर : सभापती, उपसभापती, उपसचिवांना अजूनही प्रतिसादाबद्दल विश्वास

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : एकेकाळी रेणापूरच्या विकासात व वैभवात भर पाडणारा तसेच पंचक्रोशीत नावारूपाला आलेला जनावराचा बाजार केवळ जागेचा अभाव व मूलभूत सुविधा नसल्यामुळे गेल्या दोन - तीन दशकांपासून मोडकळीस आलेला आहे. या बाजाराला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केला जात आहे.

गत वर्षी 20 मार्च 2025 ला बैलांची पूजा करून बाजारचा शुभारंभ करण्यात आला. परंतु बाजारात जनावरांची संख्या घटल्यामुळे या वर्षा दीड वर्षात केवळ दोन - अडीचशेच बैलांची खरेदी - विक्री झालेली आहे. याही वर्षी 3 एप्रिल 2026 रोजी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला आहे

लातूर - उदगीर राष्ट्रीय महामार्गावर असलेले रेणापूर हे गाव एकेकाळी जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध होते शुक्रवार व शनिवार या दिवशी जनावरांचा बाजार भरत होता. बाजारात बैल, म्हैस व इतर जनावरांची खरेदी - विक्री करण्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर प्रांतातून व्यापारी येत असत. शेळ्या - मेंढ्यासाठीही हा बाजार प्रसिद्ध आहे. दर आठवड्याला शेकडो शेळ्या - मेंढ्यांची उलाढाल होत असते.

या बाजारामुळे दलाल व इतर लहान - मोठ्या व्यावसायिकांची उपजीविका चालत होती. परंतु कालांतराने जागा व मूलभूत सुविधांचा अभाव आणि विशेषतः गावपुढाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळेच जनावरांच्या बाजारावर अवकळा पसरली आहे. शेतकऱ्यांकडे सध्या पशुधनच शिल्लक राहिले नाही. शिवाय शेती व्यवसायात यांत्रिकीकरण आल्यामुळे दरवर्षी हजारो बैलांची खरेदी - विक्री होणारा जनावरांचा बाजार आज पार लयास गेला आहे.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची मोठी यात्रा भरत होती. दाखल्याच्या उत्पन्नातून जंगी कुस्त्यांचे फड रंगत होते.जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत होते. चांगल्या व दर्जेदार पशुंची पशुपालकांमध्ये स्पर्धा होत होती मात्र गेल्या दोन - तीन दशकांपासून हे सर्व उपक्रम कायमचे बंद पडले आहेत.

बंद पडलेल्या पशुप्रदर्शन व कुस्त्यांना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न रेणापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केला जात आहे. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळत नाही. या वर्षी 3 एप्रिल 2026 ला बाजाराचा शुभारंभ झाला या कालावधीत अवध्या शंभर ते दीडशे जनावरांच्या खरेदी - विक्रीचे व्यवहार झाले.

मोडकळीस आलेल्या बाजाराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजारसाठी पाणी , वीज व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षीचा मिळालेला प्रतिसाद पाहता याही वर्षी चांगला बाजार भरेल असा विश्वास सभापती उमाकांत खलंग्रे , उपसभापती ॲड. शेषेराव हाके -पाटील व सचिव उत्तम चक्रे यांनी व्यक्त केला. तसेच या उपक्रमात पशुपालक व व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  • शेती व्यवसायात बैलांची संख्या कमी होत असतानाही हिरापूर , पाचोड, हाळी - हंडरगुळी , खसगी, नेकनूर , बेल्हे, लोणी , कारंजलाड , घोडेगाव , मलकापूर यासह इतर काही ठिकाणच्या जनावरांचे बाजार आजही टिकून आहेत. या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी - विक्री होत आहे. मात्र रेणापूरच्याच बाजारावर अवकळा का आली त्यावर काही उपाय शोधता येतात का? याचा विचार येथील गावपुढाऱ्यांनी करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT