

पैठण : पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेल्या दोन वर्षांपासून भाजीपाला मार्केटला सुरुवात झाली आहे. येथे दररोज बाजार समितीमध्ये 20 ते 25 लाखांची उलाढाल होत असून, अनेक युवकांना या भाजीपाला मार्केटमुळे हाताला काम मिळाले आहे.
पैठण येथे रोज रात्री एक ते सकाळी सहा वाजता या भाजीपाला मार्केटची सुरुवात होते. निफाड, नाशिक, गेवराई, बीड, अहिल्यानगर, नेवासा, शेवगाव, पैठण व पैठण तालुक्यातील ग््राामीण भाग आदी ठिकाणाहून मालाची आवक होते.
रात्री एक वाजेपासून भाजीपाला मार्केट मध्ये येण्यास सुरुवात होते. सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व भाजीपाल्यांचे व्यवहार हे पूर्ण होतात. पूर्वी व्यापारी अहिल्यानगर, संभाजीनगर येथून भाजीपाला आणून पैठण येथे विकत होते. मात्र बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निर्णयामुळे व पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या संकल्पनेमुळे व्यापाऱ्यांना होणारा त्रास हा कमी झाला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती नवनियुक्त संचालक मंडळ, सभापती राजू नाना भुमरे, उपसभापती अशोक पाटील एरंडे, समिती सदस्य बद्रीनाथ बोंबले यांनी तालुक्यातील, शहरातील शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी चर्चा करून बाजार समिती येथे भाजीपाला मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
सुरुवातीला मात्र अल्पसा प्रतिसाद मिळाला त्यानंतर काही महिन्यातच भाजीपाला मार्केट मध्ये तालुक्यातील व इतर परिसरातील व्यापारी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मालाला चांगला भाव मिळू लागला.
आज रोजी दररोज तालुक्यातील दोनशे ते अडीचशे शेतकरी आपला भाजीपाला दररोज बाजार समितीमध्ये येऊन लाखो रुपयांची विक्री करून जातात.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
बाजार समिती व संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य .
दैनंदिन भाजीपाला करिता चार कर्मचारी दोन सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरा.
पत्र्याचे शेड, सुरक्षा व्यवस्था.
महिला, पुरुष स्वच्छता गृह.
प्रकाशव्यवस्था व वॉटर कुलरचे थंड पाणी आदी व्यवस्था.
ठिकाण : पैठण बाजार समिती
फक्त 20 रुपये सेवा शुल्क
दलालमुक्त व्यवहार.
थेट रोख पेमेंट.
उलाढाल : 20 ते 25 लाख प्रतिदिन. आवक : जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आवक
वेळ : रात्री 2 ते सकाळी 6 या दरम्यान.
बाजार समिती व संचालक मंडळांने समितीच्या उत्पन्नापेक्षा शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य दिले आहे. भाजीपाला विक्रीमध्ये दलाल नावाचा विषय ठेवला नसून शेतकरी थेट ग््रााहकांशी चर्चा करूनच माल विकतो. या मालाची रक्कमही रोखीने दिले जातात.
राजू नाना भुमरे, सभापती, बाजार समिती.