औसा : औसा तालुक्यात सर्वच मंडळात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत झालेल्या जोरदार पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे आयुष्य अक्षरशः वाहून गेले. तालुक्यातील हजारो हेक्टर्स पिके व शेत पाण्याखाली गेले, पिके आणि माती वाहून गेली, घरादारात पाणी घुसले आहे. अनेक गावातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. उजनीत तेरणाचे पुराचे पाणी गावात शिरले तर तावरजा नदीच्या पुरामुळे आलमला गावचा गेल्या 14 तासापासून संपर्क तुटला आहे.
औसा तालुक्यात काल शुक्रवारी 11 वाजेपासून सुरु झालेला जोरदार पाऊस आज दुपारी 2 वाजेपर्यंत पाऊसाचे थैमान सुरु आहे. उजनी येथे तेरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतासह गावात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर तावरजा नदी पात्रात धरणाचे सर्वच्या सर्वा 26 दरवाजे उघडल्याने 9422 क्यूसेस पाणी सोडल्याने आलमला गावातील नदीपात्रातील पाणी अनेक शेतात, शेतातील जनावऱ्याच्या शेडमध्ये पाणी गेल्याने शेतीसाहित्य आणि पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून गेल्या 20 तासापासून ही पिके पाण्याखाली गेली. यामुळे आलमला येथील शेकडो शेतकऱ्याच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जवळगा - संक्राळ, औसा - आलमला, आलमला-लातूर, गाडवेवाडी- नागरसोगा-औसा, बानेगाव - औसा, कारला- किल्लारी, येळवट-तळणी, तपसे चिंचोली-औसा, औसा-बोरगाव-मुरुड, उटी-औसा असे दहा मार्ग यावेळी बंद होते.
तालुक्यातील तपसे चिंचोली येथील शेतकरी सलीम पठाण हे सकाळी शेताकडे जात असतानाच चिंचोली-जवळगा नाल्यावर आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यावेळी पाण्याच्या प्रचंड वेगामुळे हे मोटारसायकल सह वाहून गेले. पोहता येत असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत झाडाला पकडल्याने त्यांचा जीव वाचला.
गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्याची एकमेव आधार असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान होऊन खरीप हंगामच हाताचा गेल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.