Manoj Jarange Patil Maratha Reservation Pudhari
जालना

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती अचानक खालावली; रात्री अडीच वाजता मंत्र्यांचा फोन, सरकारने दिलं मोठं आश्वासन

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस असून मध्यरात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली.

Rahul Shelke

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अकराव्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असून मराठा समाजात चिंता वाढली आहे.

मध्यरात्री प्रकृती बिघडली, सरकारला माहिती

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती मध्यरात्री अचानक खालावली. उपोषणामुळे त्यांचे वजन कमी झाले असून रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाबही कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

तपासणीनंतर जरांगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारकडून सकाळपासून मागण्यांवर कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी सलाईन घेण्यास संमती दिली. मात्र, केवळ आश्वासनावर उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे.

मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

सरकारकडून हालचाली सुरू करण्याचे आश्वासन मिळाले असले तरी मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे आता सरकार या आश्वासनाची अंमलबजावणी कितपत वेगाने करते, याकडे मराठा आंदोलकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झाले आहे.

मध्यरात्री महामार्गावर आंदोलन, टायर जाळून निषेध

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहागड परिसरातील पैठण फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोको केला.

आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने तातडीने मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळ आंदोलक रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले होते. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाल्यास राज्यातील इतर भागांतही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

नांदेडच्या दोन आमदारांचा जरांगेंना पाठिंबा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला नांदेडमधील दोन आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

विशेष म्हणजे, याच दोन्ही आमदारांनी यापूर्वी नांदेडमध्ये झालेल्या मराठा मोर्चात सहभाग घेतल्यानंतर काही आंदोलकांकडून त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता दोन्ही आमदारांनी अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर होत असताना सरकारकडून सकाळपासून कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकार नेमकी कोणती पावले उचलते आणि त्यातून मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे सरकार आणि मराठा आंदोलक यांच्यातील पुढील चर्चा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT