Manoj Jarange Patil: '...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडणार!', मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान शांतता राखण्याचे आणि दादागिरी न करण्याचे आवाहन केले.
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
Manoj Jarange Patil Maratha Reservation ProtestPudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी उपचारांसह पाणी घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

सरकारने वेळेत निर्णय घेतला असता तर उपोषणाची वेळच आली नसती, असा दावा त्यांनी केला. 29 जून रोजीच सरकारला आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही तीन महिन्यांच्या कालावधीत ठोस निर्णय झाला नसल्याचे जरांगे यांनी म्हटले.

‘मराठा समाजाला संपवण्याचा प्रयत्न’ असल्याचा आरोप

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून सुरू असलेल्या दिरंगाईमागे मराठा समाजाबद्दलचा आकस असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या भूमिकेमुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून सरकारने परिस्थिती गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलन दडपण्यासाठी कट रचल्याचा दावा

आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी मंत्र्यांची बैठक झाल्याचा दावा करत या बैठकीत मराठा आंदोलन कसे रोखता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आंदोलकांवर पोलिसांमार्फत कारवाई घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारची कारवाई झाल्यास त्याची राजकीय जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येईल, असेही जरांगे यांनी म्हटले. या कटामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित काही व्यक्ती सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न होऊ शकतो’

मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी त्याला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. आंदोलकांनी पोलिसांशी संघर्ष न करता शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईकडे जाताना पोलिसांकडून अडथळे निर्माण झाले तरी आंदोलकांनी संयम राखावा आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाचा आवाज बंद करणे हा सत्ताधाऱ्यांचा छुपा अजेंडा आहे. जर मुंबईला जाताना आपल्या बांधवांना अडवलं किंवा त्यांना मारहाण झाली तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद पाडा.

फडणवीसांवरही जरांगेंची टीका

देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे पाटील यांनी आंदोलन दडपण्याचा विचार सत्ताधाऱ्यांच्या मनात असल्याचा दावा केला. विरोधकांवर तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होत असेल तर सरकारला जाब विचारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

‘तुम्ही आरक्षण दिले आणि पुन्हा काढून घेतले’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांवरही जरांगे पाटील यांनी टीका केली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने मराठा समाजासाठी काही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिल्याचे सांगून नंतर ते काढून घेतल्याची टीका त्यांनी केली.

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
MPSC Student Protest: MPSC पेपरफुटीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार; सरकारला घेरलं, काय आहेत प्रमुख मागण्या?

‘फडणवीसांचा मला फोन आला होता’

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला. फडणवीस यांचा फोन आल्यावर आपण त्यांच्याशी काही मिनिटे संवाद साधला होता, असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचा दावा करत जरांगे म्हणाले की, मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, असे फडणवीसांनी सांगितले होते.

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
MPSC Student Protest: ‘त्यांचा पेपर होता, आमची स्वप्नं होती!’, बोचऱ्या पोस्टर्समधून सरकारवर विद्यार्थ्यांचा जोरदार प्रहार

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरही त्यांनी फडणवीसांसोबत झालेल्या संवादाचा संदर्भ दिला. या फोन संभाषणाचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.

दादागिरी करू नये, असे आवाहन

सरकारने अडथळे निर्माण केले तरी मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, दादागिरी करू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांना रोखले किंवा कोणाला इजा झाली, तर महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गावात थांबणाऱ्यांनी आपल्या गावातच आंदोलन करावे, असेही त्यांनी सांगितले.

उपोषणाचा दहावा दिवस सुरू असताना जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. त्यातच त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक असणार आहे याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, आंदोलकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडू नये, हा संदेशही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news