Load shedding Pudhari
जालना

Load shedding Jalna: १२ तासांपासून पारध बु अंधारात; लाईटचा नुसता लपंडाव, दोनदा आली अन् चारदा गेली..!

तातडीने लाईट दुरुस्तीचे काम पूर्ण करावे आणि वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

पुढारी वृत्तसेवा

सागर राजे देशमुख

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बु गाव मागील तब्बल १२ तासांपासून वीजपुरवठ्याच्या लपंडावाने त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे परिसरात ना जोरदार पाऊस, ना वादळी वारा, तरीही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गेल्या १२ तासांत वीज नुसती ये-जा करत असून, दोनदा वीज आली तर तब्बल चारदा खंडित झाली, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ‘लाईट नेमकी गेली कुठून?’ असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. सबस्टेशनपासून ते डिव्हिजनपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी असताना, तब्बल १२ तास उलटूनही वीजपुरवठा स्थिर न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वीज नसल्यामुळे मोबाईल चार्जिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घरातील विद्युत उपकरणे तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास यांसह दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी विजेची तातडीची गरज नसली तरी घरगुती वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. ‘बिल वेळेवर भरायचे, मग वीजपुरवठाही वेळेवर द्या!’ अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे.

महावितरणने पारध बु येथील वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण स्पष्ट करून तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करावे आणि वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. १२ तासांचा हा अंधार नेमका कधी संपणार? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT