Jalna News | जामखेड येथील अंगणवाडीच्या पोषण आहारात किडे!

आठ दिवसांपूर्वी शिऱ्यात आढळला होता अळीसदृश जीव; आता कडधान्यातही काळे भुंगे व किडे आढळल्याचा पालकांचा दावा
Jalna News | जामखेड येथील अंगणवाडीच्या पोषण आहारात किडे!
Jalna News | जामखेड येथील अंगणवाडीच्या पोषण आहारात किडे!
Published on
Updated on

जामखेड: अंबड तालुक्यातील जामखेड येथील माळी गल्लीतील प्रियदर्शनी अंगणवाडी क्रमांक ५ मध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी याच अंगणवाडीत तयार करण्यात आलेल्या शिऱ्यामध्ये अळीसदृश जीव आढळल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आता पुन्हा कडधान्यामध्ये काळे भुंगे व किडे आढळल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे आढळल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामुळे अंगणवाडीला पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्य-कडधान्याची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था आणि पुरवठा यंत्रणेची तातडीने चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

आठ दिवसांत दुसरी घटना; तपासणी झाली का?

पालकांच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी अंगणवाडीत तयार करण्यात आलेल्या शिऱ्यामध्ये अळीसदृश जीव आढळला होता. त्यानंतर आता पुन्हा कडधान्यामध्ये किडे आढळल्याने एकाच अंगणवाडीत अल्प कालावधीत अशा घटना पुन्हा घडण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

पहिली घटना समोर आल्यानंतर संबंधित धान्यसाठ्याची तपासणी करण्यात आली होती का? उर्वरित धान्य वापरण्यास योग्य आहे का? त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते का? याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज आहे.

‘बालकांच्या आरोग्याशी तडजोड नको’

“अंगणवाडीतील लहान मुलांना शासनाकडून पोषण आहार दिला जातो. या आहारामध्ये किडे आढळणे ही गंभीर बाब आहे. अंगणवाडीतील कर्मचारी उपलब्ध धान्य शिजवून मुलांना देतात. त्यामुळे प्रथम शासनाकडून आलेल्या धान्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. एका अंगणवाडीत आठ दिवसांच्या कालावधीत पुन्हा अशी घटना घडत असेल, तर जामखेड गावातील सर्व अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्याची तपासणी करणे आवश्यक आहे. बालकांच्या आरोग्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होता कामा नये.” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सर्व अंगणवाड्यांतील धान्याची तपासणी करा

प्रियदर्शनी अंगणवाडीतील प्रकार समोर आल्यानंतर जामखेड गावातील सर्व अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या धान्य व कडधान्याची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

पुरवठादाराचीही चौकशी आवश्यक

अंगणवाड्यांना धान्य-कडधान्याचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडून हे धान्य कोणत्या ठिकाणाहून आले, त्याची गुणवत्ता तपासणी कधी झाली, संबंधित साठ्याची नोंद काय आहे आणि पुरवठ्यापूर्वी आवश्यक तपासणी करण्यात आली होती का, याची माहिती घेणे आवश्यक आहे.तपासणीत धान्याचा दर्जा निकृष्ट आढळल्यास दोषी पुरवठादारासह संबंधित जबाबदार यंत्रणेवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news