

Destruction of moong crop by wild animals
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असतानाच आता मूग उत्पादक शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचे नवे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटलेली असताना हरण, रानडुक्कर, सायाळ तसेच वानरांकडून मूग पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अपेक्षित साथ दिलेली नाही. पावसाळ्याचा कालावधी पुढे सरकत असतानाही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत, तर काही शेतकरी विहिरीतील उपलब्ध थोड्याफार पाण्यावर पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मूग पिकाला वन्यप्राण्यांचा मोठा फटका बसत आहे.
रात्रीच्या वेळी हरणांचे कळप व रानडुक्कर शेतशिवारात घुसून उभ्या मूग पिकाची नासधूस करीत आहेत. सायाळांकडूनही पिकाचे नुकसान होत असून, दिवसा वानरांकडून शेंगा व पिकाच्या इतर मागांची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे कसेबसे उभे केलेले आणि हातातोंडाशी आलेले मूग पीक धोक्यात आले आहे. पावसाची प्रतीक्षा करीत असतानाच शेतकरी उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विहिरीतील पाणीसाठा कमी असल्याने प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात पहारा द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतीच्या कामाबरोबरच पिकांच्या सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारीही शेतकऱ्यांच्या खांद्यावर आली आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी यंदा पुन्हा कर्ज, उसनवारी आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारावर खरीप पिकांची लागवड केली. मात्र यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भर पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वन विभाग व प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा शेतशिवारातील वावर कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.