जालना

Jalana News | बेकायदेशीर वाळू उपसा, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू माफियांविरुद्ध कारवाई; ३ गुन्हे दाखल

जालना पोलिसन अॅक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

अकबर शेख

शहागड : अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि शासकीय मालमत्तेच्या नुकसानीच्या प्रकरणी अंबड महसूल व गोंदी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या गुन्हेगारांवर गोंदी पोलीस ठाण्यात ३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कृष्णा येडके, तलाठी विश्वास ढवळे, दीपक लव्हाळे यांचा सक्रिय सहभाग होता.

कोठाळा खुर्द येथे ३०० ब्रास वाळूची चोरी

कोठाळा खुर्द येथे गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे ३०० ब्रास वाळूचे उत्खनन व चोरी केल्याप्रकरणी पुढील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर सुभाष गुळवणे, विजय विठ्ठल सोनवणे, माऊली अंजीत उबाळे, गणेश बजरंग धाये सर्वजण रा. कोठाळा खुर्द या आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) (चोरी) व २२३, तसेच खाण व खनिज अधिनियम १९५७ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींनी यापूर्वीही वाळू चोरी केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे त्यांच्यावर आता प्रतिबंधात्मक कारवाई व दंडात्मक वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हसनापूर फाटा येथे जप्त केलेला ट्रॅक्टर पळवला

मौजे हसनापूर येथे विनाक्रमांकाचा 'स्वराज ७४४' हा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना महसूल पथकाने पकडला होता. सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात आणत असताना, हसनापूर फाटा येथे एका स्विफ्ट कारमधून आलेल्या गुन्हेगारांनी शासकीय पथकाला अडथळा निर्माण करून तो ट्रॅक्टर पळवून नेला. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पुढील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. ओम विजय लांडगे (ट्रॅक्टर चालक, रा. गोंदी), पियुष पांडुरंग साळुंके (ट्रॅक्टर मालक, रा. गोंदी) या दोघांवर कलम ३०३(२), २२३ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय जमिनीच्या लिलावात फसवणूक व धमक्या

घुंगर्डे हादगाव येथील गट क्र. २४५ मधील शासकीय जमिनीच्या लिलावामध्ये (एक साल लावणी हर्रासी) जाणीवपूर्वक दहशत निर्माण करून आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन रामभाऊ वाघमारे (रा. भाग्यनगर, गोंदी), हनुमंत रामभाऊ वाघमारे (रा. भाग्यनगर, गोंदी) या आरोपींनी लिलावात सर्वाधिक बोली लावूनही शासकीय रक्कम भरली नाही, तसेच गावातील लोकांना लिलावापासून परावृत्त केले. याशिवाय, आरोपींनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली आणि मंत्रालयात आत्मदहन करण्याच्या धमक्या देऊन प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यातील आरोपी हनुमंत वाघमारे याने सदर शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमणही केले आहे.

महसूल प्रशासनाचा सक्त इशारा "उपरोक्त कारवायांवरून हे स्पष्ट होते की, महसूल प्रशासन आता अवैध वाळू वाहतूक आणि शासकीय कामातील हस्तक्षेपाबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबत आहे. यापुढेही तालुक्यातील इतर ठिकाणची गोपनीय माहिती गोळा करून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल. अवैध उत्खनन व वाहतुकीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वाळू माफिया आणि तस्करांनी बेकायदेशीर कृत्य करू नये. तसे केल्यास, त्यांच्याविरुद्ध केवळ दंडात्मकच नव्हे, तर 'मोक्का' आणि 'एमपीडीए' सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, याची गंभीर नोंद घ्यावी."
— विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT