Pudhari
जालना

Kunbi Certificate Jalna : जालना जिल्‍ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी केलेले फक्त 0.1 एवढेच अर्ज नाकारण्यात आले : जिल्हाधिकारी

कुणबी प्रमाणपत्रासाठी 'हैदराबाद गॅझेट' जीआरनुसार प्रक्रिया सुरू : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे

पुढारी वृत्तसेवा

Kunbi Certificate Jalna : जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी आज पत्रकार परिषदेमध्‍ये मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या तीन वर्षांत झालेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. या वेळी त्यांनी कुणबी दाखले वितरण, SEBC आरक्षण आणि आंतरवाली सराटीतील परिस्थितीवर माहिती दिली.

कुणबी प्रमाणपत्राठी केलेले फक्त 0.1 एवढेच अर्ज नाकारले

यावेळी अशीमा मित्तल म्‍हणाल्‍या की, न्या. शिंदे समितीमार्फत नोंदी तपासणीचे काम करण्यात आले असून जालना जिल्ह्यात एकूण ५,०२७ नोंदी आढळून आल्या आहेत, त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रासाठी १८,२०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९९.९९ टक्के अर्ज मंजूर झाले असून, फक्त ०.१ टक्के अर्ज नाकारण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नव्हती, त्यांचेच अर्ज नाकारले गेले आहेत.२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या हैदराबाद गॅझेट शासकीय अध्यादेशानुसार (जीआर) ही प्रक्रिया सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पात्र नोंदींची यादी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या त्यानुसार लावण्यात आल्या असून त्याचे फोटो प्रशासनाकडे उपलब्ध आहेत.

कुणबी प्रमाणपत्रासाठी २२ मंडळांत ६२ शिबिरांचे आयोजन

जालन्यातील २२ मंडळांमध्ये कुणबी प्रमाणपत्रांसाठी एकूण ६२ शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. काही शिबिरे आज पार पडली असून सध्या शिबिरांमध्ये ३० अर्ज प्राप्त झाले आहेत. जे कुणबी किंवा मराठा-कुणबी आहेत परंतु त्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्यांनी तातडीने अर्ज करावेत, ही एक चांगली संधी असल्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

SEBC आरक्षणांतर्गत ३५ हजार दाखले वाटप

जालना जिल्ह्यात SEBC १० टक्के आरक्षणांनुसार ३५ हजार ९८१ प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत. जात पडताळणी समितीकडे एकूण १,६६४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,०१६ प्रकरणे वैध ठरली आहेत, तर ४९२ प्रकरणे समितीकडे प्रलंबित आहेत. तसेच नातेसंबंध सिद्धतेचे पुरावे सादर न करणे आणि त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे १३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.नागरिकांनी SEBC किंवा कुणबी यांपैकी एकाच विकल्पाची निवड करावी. कायदेशीर बाबींनुसारच सर्व प्रक्रिया झाली पाहिजे आणि शासनाची फसवणूक होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे: जिल्हाधिकारी

प्रशासनाला मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी असून गेल्या तीन वर्षांत त्यांचे मराठा आरक्षणासाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असून कायदेशीर बाबींच्या बाहेर जाऊन कोणीही काम करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी आता उपोषण सोडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जोपर्यंत उपोषण सुरू आहे, तोपर्यंत अंतरवाली येथे दारूबंदी कायम राहणारअसल्याचे त्यांनी सांगितले.

विकासावर आणि कौशल्यावर भर देण्याचे आवाहन

जातीचे वादविवाद जास्त होत असल्याने हे प्रश्न मागे ठेवून नागरिकांनी विकास, कौशल्य (स्कील) यावर भर द्यावा आणि माणुसकीची प्रार्थना करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. दरम्यान, अंतरवाली येथे मोठ्या संख्येने लोक येत असल्याने अनेक मुली अनेक दिवसांपासून शाळेत जात नसल्याचे समोर आले आहे. आंतरवालीतील किती मुली शाळाबाह्य आहेत, त्याचा निश्चित आकडा अजून समोर आला नसून ती माहिती गोळा केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत असल्‍याचेही मित्तल यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT