

Manoj Jarange Patil : "मी उपोषण सोडणार नाही. मराठ्याचा अपमान तुम्ही वारंवार करत असाल, माझ्या लेकी-बाळींचं, माझ्या मराठा समाजाच्या लेकरा-बाळांचं वाटोळं करणार असाल, तुम्ही अंतरवालीला येऊ नका. तुम्ही जे षडयंत्र ठरवलंय ते करा, तुम्ही नक्की एकनाथ शिंदेंना बुडवणार आहात. ते ठरवलंय ते पटकन करा, एकनाथ शिंदेंना बुडवायचं षडयंत्र तुम्ही केलेलं, पटकन यशस्वी करा, आम्ही सामन्याला तयार आहोत, असा इशारा देत आम्ही मराठ्यांच्या लेकरांपुढे सणवार बघत नाही. १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत उद्या जाहीर करणार, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. ९ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
जे कोणी एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत त्यांनी सांगावे की, मराठ्यांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे कोणी रद्द केली, असा सवाल करत मंत्री उदय सामंत सांगत आहेत की त्यांची भाषा संयमाची आहे. संयम तुम्ही न बाळगता काय करणार आहात. उदय सामंत यांना दोन महिने झाले सांगतो, सलग 'प्रमाणपत्र द्या'. संभाजीनगरला बसून दंगल करायचं ठरवलेलं का तुम्ही? उदय सामंत आणि शिरसाट दोघं फोनवर बोललेले आहात. मी हे परवा दिवशी सांगितलेलं आहे. एकाने मारल्यासारखं करायचे तर एकाने रडल्यासारखं करायचे. पण प्रमाणपत्र मात्र द्यायचं नाही; हे सगळ्यांचे मिळून षडयंत्र आहे. विखेंकडे वेगळे लोक चर्चेला यायचे आणि उदय सामंतकडे वेगळे यायचे. त्यांना दंगल करायचीय. एकनाथ शिंदे यांना मराठ्या-मराठ्यांत मारामाऱ्या लावायच्यात, असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
सर्व पक्षांतील मंत्री, आमदार एकत्र झाले तरी मराठ्यांना आव्हान देऊ शकत नाहीत. तुम्ही आम्हाला काय धमक्या देताय? तुम्ही वेगळ्या भाषेत धमकी द्या, फक्त धमक्या द्या, पण वेगळ्या भाषेत द्या, तुम्ही संयम सोडल्यावर काय करणार? मराठ्यांचं काय करणार तुम्ही? पुरे महाविकास आघाडीसहित तुम्ही एकत्र या आमदार, महायुतीसहित. तुमची भरलीच आता, येणारच. आता निर्णय होणारच, असा निर्धारही जरांगे यांनी केला.
पोळा आहे, मराठवाड्यात पुष्कळ आहे, राज्यात गणेशोत्सवाचा सण आहे आणि त्यामुळे त्यांनी विनंती केलीय की आंदोलन स्थगित करावं. आंदोलन स्थगित? पोळ्याला नाचायला जायचं का बैलापुढे? 'अमकं करावं, तमकं करावं.' कामाचं बोल कामाचं! आम्ही मराठे आता लेकरांपुढे सणवार काय बघत नाही. कामाचं बोल, बाकीचं बोलू नको. आरक्षणाचं काय झालं? व्हॅलिडिटी देतो म्हणत होते जालन्याच्या ६ तारखेला, हैदराबाद गॅझेट, त्याचं काय झालं? हैदराबाद गॅझेट लागू होणार होतं ८ तारखेला. आज ९ सप्टेंबर तारीख आहे. त्याच्यावर बोल, त्याच्यावर बोल आधी! प्रमाणपत्र चार दिवसांच्या आत देतो म्हणाले होते, रद्द केलेले ते, त्याचं काय झालं? त्याच्यावर बोल!, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.
१२ सप्टेंबरच्या आत प्रश्न सोडवले, तर मुंबईला नाही जाणार, असे मी पहिल्यापासून म्हणतो. १२ ला प्रश्न सोडवले नाहीत, तर मुंबईतील आंदोलनाची तारीख डिक्लेअर झालीच. प्रमाणपत्र दिलं, चांगलं होणार. पण १००% हे लोक गरीब मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्यापासून तोडायला लागले. त्यांनी प्रमाणपत्र दिले असते तर कशाला बोललो असतो?, असे स्पष्ट करत आता १२ तारखेच्या आंदोलनाबाबत उद्या (गुरुवारी) तारीख व वेळ सांगतो, असेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले.