बुलडाणा: पुढारी वृत्तसेवा : नगर परिषदेचा मालमत्ता कर भरण्यासाठी खामगावातील एका चीप्स विक्रेत्याने एक, दोन व पाच रूपयांची तब्बल ५४ हजारांची सुटी नाणी आणली. चार कॅरेट्समधून आणलेली ही चिल्लर मोजावी कधी? असा प्रश्न पडल्याने कर विभागातील कर्मचारी तारांबळ उडाली.
खामगावातील जगदीश कल्याणदास बोहरा यांचेकडे न.प.चा ९३ हजार ८३३ रूपयांचा मालमत्ता कर भरायचा होता. त्याचा भरणा करण्यासाठी त्यांनी भलीमोठी ५४ हजारांची चिल्लर आणल्याने कर्मचाऱ्याची तारांबळ उडाली. एक, दोन रूपयांची नाणी मोजत बसणे हे काम वेळखाऊ तर आहेच. पण एकाचवेळी एवढी सुटी नाणी स्विकारायची का?याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले.
अखेर तांत्रिक कारण पुढे करून यापैकी २० हजार रक्कमेची नाणी स्विकारली गेली व उर्वरित रक्कमेचा भरणा टप्प्या-टप्प्याने करण्याचा संबंधिताला सल्ला दिला. या घटनेने 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' या मराठी चित्रपटाची आठवण झाली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…