Uddhav Thackeray : फडणवीसांना रोखण्यासाठी 'ऑपरेशन देवेंद्र' file photo
हिंगोली

Uddhav Thackeray : फडणवीसांना रोखण्यासाठी 'ऑपरेशन देवेंद्र'

उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतून शिंदे सेनेसह भाजपवर जोरदार घणाघात

पुढारी वृत्तसेवा

'Operation Devendra' to stop Fadnavis

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील जाहीर सभेतून बंडखोर खासदारांवर आणि महायुती सरकारवर शब्दांचे तीव्र बाण सोडले. फुटून गेलेले खासदार आणि फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी शिंदे सेना आणि भाजपला लक्ष केले. हे 'ऑपरेशन टायगर' नसून, देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यासाठी अमित शाह यांनी रचलेले 'ऑपरेशन देवेंद्र' आहे, असा खळबळजनक दावा ठाकरेंनी केला. तसेच काम संपले की मिंध्यांना कचऱ्याच्या टोपलीत फेकले जाईल, हे आजच लिहून ठेवा," अशा अत्यंत तिखट शब्दांत टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, की फुटलेले खासदार थेट भाजपमध्ये जाण्याऐवजी मिंध्यांकडे का गेले? हे एक मोठे कोडे होते. मात्र, यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस हे आज ना उद्या दिल्लीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरतील, अशी भीती तिथल्या नेत्यांना आहे. म्हणूनच त्यांचे पंख कापण्यासाठी आणि महाराष्ट्रातील कोणताही नेता दिल्लीत पोहोचू नये म्हणून अमित शाह यांनी हे खासदार मिध्यांकडे सरकवले आहेत, जेणेकरून फडणवीस महाराष्ट्राच्याच राजकारणात गुंतून राहतील. उद्या जर पंतप्रधान निवडीचा प्रश्न आला, तर हे अमित शाह यांच्याच बाजूने उभे राहतील. ही पुढची व्यवस्था करण्यासाठीच शिवसेना फोडण्यात आली आहे.

हिंगोलीतील खा. नागेश आष्टीकर यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले होते. साहेब १०० टक्के सोबत आहोत, असे सांगून रात्रीतून पैसे घेऊन पसार होणाऱ्या या गद्दारांना जर शिवसेनेने खासदार-आमदार केले नसते, तर यांच्या दाराला कुत्रंही उभं राहिलं नसते. आम्ही केले तर तीला घराणेशाही म्हणायचे. पण तिकडे ते स्वतः उपमुख्यमंत्री बनून बसलाय आणि त्याचे कारटे दिल्लीत बसून आमचे खासदार फोडत आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे पिता-पुत्रांवर कडक शब्दांत टीका केली. माझ्या नावावर आणि माझ्या दौऱ्यांमुळेच हे खासदार निवडून आले होते.

केंद्रीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ला

केंद्रीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले, यांनी आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आमदार-खासदार फोडले. तरीही ठाकरे आज ताठ कण्याने मैदानात उभे आहे. आमदार फोडल्यानंतरही शिवसैनिकांनी मेहनत करून या खासदारांना पुन्हा निवडून दिले होते, पण हे विकले गेले. सध्या राज्यात निवडणुका नसतानाही संवैधानिक यंत्रणा आणि केंद्रातील सत्तेच्या मदतीने ही फोडाफोडी सुरू आहे. असे सांगत ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणा व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT