

Danve made a deal with Shinde group for 18 crores.
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संजय निकम निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आमचा शिंदे गटासोबत १८ कोटी रुपयांमध्ये सौदा केला होता, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी गुरुवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक पार पडण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षातील काही सदस्यांवरच संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. आता जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ते आरोप फेटाळून लावत उलट दानवे यांच्यावरच गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे.
निकम म्हणाले की, . आपण केवळ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत मतदान प्रक्रियेपासून लांब राहिलो आहे. तथापि जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी १० ते १७ मार्च या कालावधीत निवडून आलेल्या नऊ सदस्यांची इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत गोवा अशा ठिकाणी ट्रिप घडवून आणत आम्हाला अक्षरशः ओलीस ठेवले खंडणी जमा करणे, प्लॉट बळकावणे, प्रॉपर्टी हडप करणे हे दानवे यांचे नेहमीचे काम असल्याचा टोलाही निकम यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
ते म्हणाले, ८ फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मी मतदारांचा दौरा करत नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. तसेच मतदारांनी सत्तेसोबत कसे जाता येईल याबाबतही भावना व्यक्त केल्या. त्यानंतर निवडून आलेल्या जिल्ह्यातील नऊ सदस्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची २१ फेब्रुवारीला भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणी व संघटन करण्यास सांगितले.
तसेच सत्तेसाठी भाजप किंवा शिवसेनेसोबत जाणे उचित होणार नाही असेही सांगितले, मात्र त्यानंतर जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी १० मार्चला सर्व नऊ सदस्यांना एकत्र बोलावले व सहल घडवून आणत आमचा परस्पर १८ कोटी रुपयांना अध्यक्षपदासाठी सौदा केला. यातील चार कोटी रुपये त्यांनी स्वतः घेतले असून, उर्वरित रक्कम मतदान केल्यानंतर त्यांना मिळणार होती व त्यातील काही रक्कम ते सदस्यांच्या पदरात टाकणार होते. या बाबीची भणक लागताच आम्ही तातडीने पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर व मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क केला व आपली भूमिका सांगितली. त्यानंतर आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय हालचाली, सदस्यांचे स्थलांतर आणि अचानक बदललेली समीकरणे यामुळे या निवडणुकीभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. निकम यांनी केलेल्या १८ कोटींच्या सौद्याच्या आरोपामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आरोपांवर अंबादास दानवे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे ठाकरे गटात अंतर्गत मतभेद तीव्र झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अशी केली सुटका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊ सदस्यांना आठ दिवस ओलीस ठेवण्यात आले. सोबत सुरक्षारक्षकांचा कडक पहारा होता. तसेच आमचे मोबाईलही काढून घेण्यात आले होते. मात्र आम्हाला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करायचे असल्याने व दानवे यांची भूमिका मान्य नसल्याने सुरुवातीला मी व ललिता सोनवणे यांनी १७ मार्चला मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने सुटका करत तेथून पलायन केले व नंतर बाकीचे सदस्य तावडीतून सुटले, असे निकम यांनी स्पष्ट केले.